Pune : तब्बल १९ वर्षांनी होणार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
By नितीन चौधरी | Updated: January 13, 2023 19:58 IST2023-01-13T19:57:42+5:302023-01-13T19:58:33+5:30
अंतिम मतदार यादी १५ मार्चला प्रसिद्ध होऊन २९ एप्रिलला मतदान होणार...

Pune : तब्बल १९ वर्षांनी होणार पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक
पुणे : तब्बल १९ वर्षे प्रशासकीय कार्यकाळ असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह राज्यातील अन्य बाजार समित्यांच्या निवडणुका घेण्यावरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती उठविल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार अंतिम मतदार यादी १५ मार्चला प्रसिद्ध होऊन २९ एप्रिलला मतदान घेऊन निकाल ३० एप्रिलला जाहीर करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. तसेच राज्यातील निवडणुकीस पात्र २८१ बाजार समित्यांच्याही निवडणुका ३० एप्रिलपूर्वी होणार आहेत.
राज्यात अग्रगण्य असलेली आणि उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. १३) दिले. जिल्हा उपनिबंधकांनी आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार या कारणांमुळे या समितीचे २००३ मध्ये संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर तब्बल १९ वर्षे या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळाची नियुक्ती न होता प्रशासक राज कायम राहिले. राज्यातील कोणत्याही पक्षाच्या सरकारने समितीच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्याचेच धोरण अवलंबिले. आता ही प्रशासकीय राजवट संपून लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्रातील बहुतांश प्राथमिक कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्यानुसार पुणे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरु करावी, असे आदेश प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिले आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
सदस्य सुची मागविणे : २७ जानेवारी
प्रारुप मतदार यादीसाठी ही सदस्य सुची बाजार समिती सचिवांकडे सुपूर्द करणे : ३१ जानेवारी
सचिवांनी प्रारुप मतदार यादी तयार करणे : ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी
प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (कृषी उत्पन्न बाजार समिती) सादर करणे : १५ फेब्रुवारी,
प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करणे : २० फेब्रुवारी,
आक्षेप, हरकती मागविणे २० फेब्रुवारी ते १ मार्च २०२३
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १५ मार्च
निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : २७ मार्च
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस : ३ एप्रिल
अर्जांची छाननी : ५ एपिल,
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस : २० एप्रिल
मतदान : २९ एप्रिल
मतमोजणी : ३० एप्रिल
अन्य निवडणुकाही ३० एप्रिलपूर्वीच
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यातील सर्व पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वीच घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही बाजार समित्यांच्या प्रारुप याद्या तयार नाहीत. तसेच अनेक समित्यांना निधीची अडचण आहे. यातून मार्ग काढला जाईल. आणि न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व पात्र २८१ बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपूर्वीच घेतल्या जातील, असेही खंडागळे यांनी सांगितले.