Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 21:05 IST2021-12-03T21:05:00+5:302021-12-03T21:05:10+5:30
अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे

Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही
पुणे : पुणे महानगरपालिकेजवळ भाजपच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. महिला, कार्यकर्ते यांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ''महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही'' असा विश्वास भाषणातून व्यक्त केला आहे.
फडणवीस म्हणाले, उदघाटनाला आलेल्या नागरिकांची ही गर्दी पाहून भाजप महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मला अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
''कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.''
पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली
''जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाही. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''