बांदलवाडी शाळेत शिक्षिका नसल्याने शिक्षण थांबवले; पुरंदर शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:08 IST2025-11-08T10:08:27+5:302025-11-08T10:08:47+5:30
- गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक असल्यामुळे शिक्षिका रेणुका शेंडकर यांची तोंडी बदली बोपगाव शाळेत करण्यात आली होती.

बांदलवाडी शाळेत शिक्षिका नसल्याने शिक्षण थांबवले; पुरंदर शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
जेजुरी : काळदरी (ता. पुरंदर) केंद्रातील बांदलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १४ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत शिक्षिका अनुपस्थित राहिल्याने शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले. डोंगराळ व दुर्गम भागातील फक्त तीन विद्यार्थ्यांची ही शाळा शिक्षकांशिवाय चालत असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षी जून २०२४ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक असल्यामुळे शिक्षिका रेणुका शेंडकर यांची तोंडी बदली बोपगाव शाळेत करण्यात आली होती. मात्र यंदा विद्यार्थ्यांची संख्या तीन आहे. परंतु, रवींद्र गावडे यांच्या १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑनलाइन बदलीनंतर पुरंदरच्या शिक्षण विभागाकडून शेंडकर यांना बांदलवाडीत रुजू होण्याचे आदेश दिले गेले नाहीत. दरम्यान, शाळेत केवळ स्वयंपाकी महिला उपस्थित होऊन मध्यान्ह भोजनाची तयारी करत होत्या, तर मुले शिक्षणाऐवजी खेळण्यात वेळ घालवत होती.
ग्रामस्थ म्हणतात, “शिक्षक येत नाहीत, मुलं रिकामी बसतात. शिक्षण विभागाला वारंवार सांगूनही काहीच हालचाल नाही.”गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांनी सांगितले, “रेणुका शेंडकर यांची बांदलवाडी येथून बोपगाव शाळेत तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तोंडी बदली केली होती.
रवींद्र गावडे यांच्या बदलीनंतर शेंडकर पुन्हा रुजू झाल्या आहेत.” मात्र, रेणुका शेंडकर या १४ ऑक्टोबरपासून ३ नोव्हेंबरपर्यंत गैरहजर होत्या, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ग्रामीण शाळांकडे अशा निष्काळजीपणामुळे शिक्षण विभागाचे दुर्लक्षच उघड होते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.