संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:17 PM2021-08-28T20:17:58+5:302021-08-28T20:18:40+5:30

रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. 

Editor, writer Anand Antarkar passes away; He took his last breath at the age of 80 | संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

संपादक व लेखक आनंद अंतरकर यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

googlenewsNext

पुणे : हंस, मोहिनी व नवल या मासिकांचे संपादक आणि लेखक आनंद अंतरकर (वय ८०) यांचे शनिवारी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी दुपारी ११ वाजता निधन झाले. महिन्याभरापूर्वी त्यांच्यावर पोटाच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णशय्येवरूनही ते शेवटच्या क्षणापर्यंत दिवाळी अंकांची कामे निष्ठेने आणि जिद्दीने करत होते. 

त्यांच्या पश्चात पत्नी प्रियदर्शिनी (ग. दि. माडगूळकर यांची कन्या),पुत्र अभिराम, कन्या मानसी आणि जावई प्रसिद्ध अभिनेते पंकज विष्णू असा परिवार आहे. प्रसिद्ध सिनेपत्रकार अरुणा अंतरकर, लेखिका अनुराधा औरंगाबादकर आणि चित्रपटकार हेमलता अंतरकर या त्यांच्या भगिनी होत.

आनंद अंतरकर यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९४१ रोजी मुंबई येथे झाला. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात जी. डी. आर्ट कमर्शियलचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वडिलांच्या ‘हंस’ प्रकाशन संस्थेत १९५९ ते १९६६ दरम्यान संपादनाचे संस्कार घेत त्यांनी नियतकालिकांच्या संपादनाची ७ वर्षे उमेदवारी केली. वडिलांच्या अकस्मिक निधनानंतर हंस, मोहिनी व नवल या मासिकांच्या संपादनाची धुरा त्यांनी ५५ वर्षे सांभाळली.

आनंद अंतरकर यांना लहानपणापासूनच साहित्याची आवड होती. संपादनाचे कार्य करत असताना त्यांना लेखनाची रूची जडली. इंग्रजी-हिंदी कथांचे अनुवाद, स्वतंत्र कथा लेखन, ललित कथा लेखन आदी साहित्यप्रकारांचे त्यांनी २५ वर्षे लेखन केले. झुंजूरवेळ आणि रत्नकीळ या दोन पुस्तकांचे लेखन केल्यावर त्यांना लेखक म्हणून मान्यता मिळू लागली. ‘छायानट’ हे त्यांनी स्वत: काढलेल्या छायाचित्रांवर आधारित आठवणींवरील पुस्तक प्रसिद्ध आहे. जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रव्यवहारावर आधारित ‘एक धारवाडी कहाणी’ ही ललितकृती त्यांनी प्रकाशित केली. ‘घूमर’ आणि ‘सेपिया’ ही त्यांच्या अलीकडच्या काळातील दोन लक्षवेधी पुस्तके आहेत. रुग्णालयात जाण्यापूर्वी आनंद अंतरकरांनी यंदाच्या दिवाळी अंकांचे बहुतांश काम पूर्ण केले होते, असे अभिराम अंतरकर यांनी सांगितले.

Web Title: Editor, writer Anand Antarkar passes away; He took his last breath at the age of 80

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.