ED arrests NCP MLA; Shivajirao Bhosale financial scam case | ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला अटक; शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरण 

ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला अटक; शिवाजीराव भोसले बँक आर्थिक घोटाळा प्रकरण 

पुणे : शिवाजी भोसले सहकारी बँक आर्थिक गैर व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले यांना ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने अटक केली आहे. मात्र, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक करत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली होती. आता ईडीने भोसले यांच्यासह चार जणांवर अटक केली आहे.

ईडीने सोमवारी केलेल्या कारवाईत यामध्ये राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार व बँकेचे संचालक अनिल भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ यांच्यासह चीफ अकाउंटंट शैलेश भोसले यांना अटक केली आहे. 

ईडीच्या पथकाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर १६ जानेवारी रोजी छापे टाकले होते. बँकेशी संबंधित असलेल्या पुणे आणि लगतच्या विविध भागांमध्ये कारवाई करत महत्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले होते.

बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आर्थिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. रिझर्व बँकेच्या 2018 ते 2019 सालातील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. यात जवळपास 72 कोटी रुपयांची अनियमितता आढळली होती. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करून फौजदारी कारवाई  सुरू करण्यात आली होती. यामध्ये माजी आमदार व बँकेचे संचालक शिवाजीराव भोसले, सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

ईडीने मनी लॉंड्रिंग प्रोटेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भोसले यांच्यासह अन्य आरोपींवर बँकेच्या पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पैसे वाटप करताना बँकेने आरबीआय  आणि सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचे ईडीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ED arrests NCP MLA; Shivajirao Bhosale financial scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.