आमदार अनिल भोसलेंच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; 30 कोटींच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 17:42 IST2020-09-29T17:39:01+5:302020-09-29T17:42:44+5:30
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

आमदार अनिल भोसलेंच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; 30 कोटींच्या मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव
पुणे : आमदार अनिल भोसले यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. यामध्ये त्यांच्या दोन महागड्या गाड्या आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील सहकारी पडवळ याची देखील एक गाडी जप्त करण्यात आली आहे. या तिन्ही गाड्यांची किंमत 1 कोटी 23 लाखांच्या घरात आहे. जप्त करण्यात आलेल्या गाड्या शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. याबरोबरच अनिल भोसले यांनी 30 कोटी रुपयांची मालमत्ता पुणे पोलिसांनी शोधली असून त्याच्या जप्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या गुन्हयात त्यांना अटकही करण्यात आली होती. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी दोन वेळा अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. सहकारी बॅंकेतील घोटाळ्यासंदर्भात भोसलेंवर कायदेशीर कारवाई झाली आहे. त्यांच्यावर तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. या बॅंकेचे रिझर्व्ह बॅंकेने 2018-19 चे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही कारवाई मागील दोन आठवड्यांपासून सुरु आहे. भोसले यांची लॅण्ड क्रुझर, टोयाटा कॅमरी आणि मारुती बलेनो या गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. यांची किंमत सव्वा कोटीच्या आसपास आहे. त्यांच्या मालकीच्या आणखी दहा ते बारा गाड्यांवरही जप्ती आणण्याची तयारी सुरु आहे. लॉकडाऊनपुर्वी भोसले यांच्यासह 16 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे इतर कार्यवाहीस थोडा विलंब झाला होता. या गुन्हयासंदर्भात एमपीआयडी न्यायालयात दोषारोपपत्रही मे महिण्यात सादर झाले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने 30 ते 32 कोटी किंमत असलेल्या 18 मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यांची जवळपास 170 बॅंक खाती गोठवण्यात आली आहेत, यामध्ये दोन कोटी रुपयांची रक्कम आहे.
या प्रकरणात आता पर्यंत 153 कोटी हुन अधिक रक्कमेचा गैर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे