पुणे: अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीच्या डोक्यात वार करून खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला. पोलिसांच्या तपासात ओळख परेडमध्ये ‘दुर्गा’ श्वान हिने आरोपीच्या अंगाला कोयत्याचा वास सुंगून भुंकून आरोपीला दर्शवित विशेष कामगिरी केली.
मधुकर रामचंद्र पाटील (वय ५२ वर्षे, नांदे, ता. मुळशी, जिल्हा पुणे, मूळ रा. कापसे, सावरगाव, ता. बार्शी, जिल्हा सोलापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २०१९ मध्ये घडली. घरमालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना एका भाडेकरूचा फोन आला की भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मधुकर रामचंद्र पाटील आणि त्याच्या पत्नीची भांडणे चालू आहेत. खोलीकडे जाताना रस्त्यावर आरोपीची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्याच्या पत्नीला रुग्णालयाला नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णालयात नेल्यावर तिचा मृत्यू झाला. आरोपी मधुकर याला असे का केले? विचारले असता, त्याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. ती अरेरावीची भाषा करू लागल्याने तिला कोयत्याने मारले असल्याचे सांगितले. दरम्यान, पोलिसांनी तपासावेळी ओळख परेडच्या वेळी आरोपीसह आजूबाजूच्या लोकांना उभे केले होते. यात क्रमांक तीनवर आरोपीला उभे करण्यात आले. दुर्गा श्वान हिने कोयत्याचा वास सुंगून भुंकून आरोपीला दर्शविले. त्यानंतर आरोपीला पाचव्या क्रमांकावर उभे केले. तेव्हाही श्वानाने आरोपीला ओळखले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
वकील जावेद खान यांनी बाजू मांडली. पौड पो. स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तपास केला. अल्ताफ हवालदार, जय पवार (सध्या लोणावळा ग्रामीण पो. स्टेशन (दप्तरी), अकबर शेख (समन्स) तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक विद्याधर निचित, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी काम पाहिले.