पुणे-नगर रस्त्यावर डंपरची आठ वाहनांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 15:40 IST2018-05-06T15:40:08+5:302018-05-06T15:40:08+5:30
अपघातात दोघे किरकोळ जखमी

पुणे-नगर रस्त्यावर डंपरची आठ वाहनांना धडक
पुणे : नगर रोडवर वाघोली येथील लेक्सिकॉन शाळेजवळ चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. डंपरने दुभाजक तोडून समोरुन आलेल्या ८ चारचाकी वाहनांना धडक दिली. त्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर डंपरचालक पळून गेला. दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
डंपर लोणीकंदहून खडी घेऊन पुण्याकडे येत होता. लेक्सिकॉन शाळेजवळ हा डंपर आला असताना अचानक चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी शाळेतील नीटची परिक्षा सुटली असल्याने रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. नियंत्रण सुटलेल्या डंपरने मधील दुभाजक तोडून पलीकडून येणाऱ्या वाहनांना धडक दिली. डंपरने एकापाठोपाठ ८ वाहनांना जोरदार धडक दिली. त्यात राणी विटकर आणि अंली मनोवरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामुळे गर्दीच्यावेळी येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. पोलीस डंपरचालकाचा शोध घेत आहेत.