पुणे : भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवतीचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, पसार झालेल्या डम्पर चालकाविरोधात बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुक्ता संतोष काळे (१९, रा.म्हाळुंगे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
अपघातात दुचाकीस्वार महिला शिल्पा कांबळे (३६, रा.बालेवाडी गाव) जखमी झाल्या. याबाबत कांबळे यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डम्पर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुक्ता काळे ब्युटीपार्लर प्रशिक्षण अभ्यासक्रम करत होती. मंगळवारी (दि. २१) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीस्वार शिल्पा कांबळे आणि मुक्ता काळे बाणेर भागातील गणराज चौकातून निघाल्या होत्या. त्यावेळी सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव डम्परने धडक दिली. दुचाकीवरील सहप्रवासी मुक्ता डम्परच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिल्पा यांना दुखापत झाली. सहायक पोलिस निरीक्षक ऋतुजा जाधव तपास करत आहेत.