पावसामुळे २३ धोकादायक गावांची विकास कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 19:36 IST2018-07-10T19:36:19+5:302018-07-10T19:36:56+5:30

जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.

Due to rain development works of 23 dangerous villages have been blocked | पावसामुळे २३ धोकादायक गावांची विकास कामे ठप्प

पावसामुळे २३ धोकादायक गावांची विकास कामे ठप्प

ठळक मुद्देधोकादायक गावांसाठी जिल्हा प्रशासनाला यंदा ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर

पुणे: माळीण दूर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनातर्फे शोधण्यात आलेल्या धोकादायक २३ गावांची विकास कामे पावसामुळे ठप्प आहेत.राज्य शासनाकडून या गावांसाठी योग्य वेळी निधी प्राप्त न झाल्यामुळे या गावांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे शक्य झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे धोकादायक गावांची कामेही निविदा प्रक्रियेत अडकून राहिल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील वेल्हे, मुळशी, भोर, जुन्नर, आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील २३ गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला होता.त्यानुसार संबंधित गावांच्या भोवती सुरक्षा भिंत बांधणे,पावसाच्या पाण्याला योग्य दिशा देणे, झाडे लावणे आदी कामे केली जाणार होती.त्यामुळे शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.गेल्या वर्षी ही या गावांच्या विकास कामांसाठी निधी नव्हता.त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेण्याबाबत चर्चा झाली होती.
या धोकादायक गावांसाठी जिल्हा प्रशासनाला यंदा मार्च महिन्यात ३ कोटी ६५ लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.परंतु,या गावांमधील विकास कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करणे आणि वन विभासह इतर विभागांची मान्यता घेणे आदी कामे पावसाळ्यापूर्वी झाली नाही. मात्र,एकूण धोकादायक 23 गावांपैकी १६ गावांतील कामांना सुरुवात झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
भोर तालुक्यातील जांभूळवाडी, पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली, मुळशी तालुक्यातील घुटके आणि वेल्हे तालुक्यातील आंबवणे ही गावे वन क्षेत्रात येत असल्याने या गावांच्या कामासाठी वन विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांची कामे सुरू करण्यास  विलंब झाला.जिल्हा प्रशासनातर्फे काही गावांची विकास कामे सुरू करण्यात आली होती. तर काही गावांच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे .
--------------------
जिल्ह्यातील दरडप्रवण गावे : फुलवडे जवळील भगतवाडी, माळीण परिसरातील परसवाडी, आसाणे, जांभोरीजवळील काळेवाडी आणि बेंडारवाडी (सर्व आंबेगाव तालुका), लोहगड, ताजे, बोरज, तुंग-भैरवनाथ मंदिर परिसर, माळवाडी, माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी (सर्व मावळ), मोरगिरी पदर वस्ती, भोमाळे (खेड), जांभूळवाडी (कोर्ले), पांगारी सोनारवाडी, डेहेन, धानवली खालची (सर्व भोर), घुटके (मुळशी), आंबवणे, घोल (वेल्हा), निमगिरी अंतर्गत तळमाची (जुन्नर).

Web Title: Due to rain development works of 23 dangerous villages have been blocked