Due to non-payment of salaries for the last three months, the employees of ST Corporation are facing financial crisis | दिवाळी कसली साजरी करताय? इथं पोट भरायची भ्रांत : एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा 

दिवाळी कसली साजरी करताय? इथं पोट भरायची भ्रांत : एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा 

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊनमुळे एसटीची बससेवा पूर्णपणे बंद

पुणे : मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पोट भरायचीच भ्रांत असल्याने यंदाची दिवाळी अंधारातच घालवावी लागणार असल्याची व्यथा कर्मचारी मांडत आहेत. लॉकडाऊन काळात कुणी गवंड्याच्या हाताखाली, कुणीत शेतमजुरी तर कुणी भाजीपाला विकून पोट भरले. पण आता बससेवा सुरू झाल्यानंतर ही कामेही बंद करावी लागल्याने कर्मचाऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतल्यासारखे झाले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊनमुळे एसटीची बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. जवळपास चार महिने सेवा ठप्प असल्याने या काळात अनेकांना पुर्ण वेतनही मिळाले नाही. त्यामुळे अनेकांना अन्य कामे करून कुटूंबाचे पोट भरावे लागले. काही गवंड्याच्या हाताखाली काम केले. काहींनी भाजीपाला विकला. वाहतुकदारांकडे चालक, शेतमजुरी अशी कामे करावी लागली. बससेवा सुरू झाल्यानंतरही दररोज ड्युटी नसल्याने पुर्ण वेतनही मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे काहींनी अन्य कामे सुरूच ठेवली. पण एसटीचे तीन महिन्यांपासून वेतनच मिळत नसल्याने अनेक कर्मचापुढे रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बारामती बस आगारात चालक म्हणून नोकरीस असलेले अशोक जंगले हे मागील महिन्यापर्यंत गवंड्याच्या हाताखाली काम करत होते. ‘एसटीमध्ये काम नसेल त्यादिवशी मजुरीला जायचो. त्यादिवसाचे ४५० ते ५०० रुपये मिळायचे. पण तीन महिन्यांपासून वेतनच नसल्याने घरभाडे देणेही आता कठीण झाले आहे. गावी असलेल्या आई-वडिलांना पैसे पाठविता येत नाहीत. त्यामुळे यंदा आमची दिवाळी नाही,’ अशी व्यथा जंगले यांनी मांडली. जंगले यांच्याप्रमाणे अनेक कर्मचाऱ्यांची हीच स्थिती झाली आहे.
------------
शेतात राबलो, पावसाने सगळं गेलं
लॉकडाऊन काळात गावी विदर्भात जाऊन स्वत:च्या शेतात राबलो. पण पावसाने हातातोंडाशी आलेले सोयाबीन आणि कापूसाचे पीक वाया गेले. आता पुन्हा बारामतीत आलो असून रोजच्या खर्चालाही पैसे नसल्याने पत्नी दुसऱ्याच्या शेतात राबतेय. इथे चार महिन्यांचे घरभाडे थकले आहे. दिवाळी साजरी करायची असेल तर दुसऱ्यापुढे हात पसरण्याशिवाय पर्याय नाही, असे चालक स्वप्निस तोडासे यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Due to non-payment of salaries for the last three months, the employees of ST Corporation are facing financial crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.