नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 16:16 IST2018-10-09T16:04:26+5:302018-10-09T16:16:52+5:30
जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ ही दिवस उपवास करणा-यांची संख्या खूप मोठी असते

नवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली
पुणे: जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात बुधवार (दि.१०) पासून नवरात्रोत्सव सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ ही दिवस उपवास करणा-यांची संख्या खूप मोठी असते. यामुळे गेल्या काही दिवसांत मार्केट यार्डातील भुसार बाजारात शेंगदाणा, साबुदाणा, राजगिरा, भगर आदी पदार्थांची मागणी वाढली आहे. यंदा उपवासाच्या पदार्थांचे उत्पादन व आवक देखील चांगली आहे. यामुळे गत वर्षीच्या तुलनेत यंदा दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे. 
    नवरात्र उत्सवाच्या कालावधीत साबुदाणा, भगर, राजगीरा, शिंगाडा, कुट्टु, शेंगदाणा व  त्यांपासून तयार होणा-या पदार्थ्यांना मोठी मागणी असते. बुधवारी  घटस्थापना होत असून,  उपवासाच्या साहित्यांना मागणी वाढण्यास सुरवात झाली आहे. मार्केटयाडार्तील भुसार बाजारात भगरीची नाशिक, ठाणे तसेच रायगडच्या पट्ट्यामधून दररोज सात ते दहा गाड्या आवक होत आहे. तर, तामिळनाडूमधील सेलम जिल्ह्यातून साबुदाण्याच्या १० ते १२ गाड्या, कर्नाटक, गुजरात आणि राज्याच्या विविध भागातून गुजरात जाडा, कर्नाटक घुंगरू आणि स्पॅनिश आदी शेंगदाण्याच्या प्रकाराच्या १० ते १५ गाड्ड्या बाजारात दाखल होत आहे. उत्तर भारतातूनही शिंगाडा, कुट्टु आदी पदार्थांची मोठी आवक वाढत आहे.     
    याबाबत व्यापारी महेश गांधी यांनी सांगितले की,  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भगरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भावात पंधरा टक्कयांनी घट झाली आहे. मागील वर्षी भगरीला प्रतिकिलो शंभर रुपये भाव मिळाला होता. तर, काही दिवसांपुर्वी साबुदाण्याचे भावही तेजीत असल्याचे दिसत होते. मात्र, शेतक-यांनी साठवणुकीतील माल बाहेर काढल्यानंतर साबुदाण्याचे भाव उतरले आहेत. मागणीच्या तुलनेत उपवासाच्या पदार्थांची आवक कायम असल्याने त्याचे भाव वाढण्याची शक्यता नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. 

