मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 22:09 IST2018-07-06T22:09:36+5:302018-07-06T22:09:47+5:30
अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली.

मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिका, वाहनांचे मोठे नुकसान
पुणे (कामशेत) - अपघाताच्या 24 तासानंतरही मृत म्हैस रस्त्यावरून न हटविल्याने पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत हद्दीतील खिंडीत शुक्रवारी चार वाहनांचा अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या मृत म्हशीमुळे रस्त्यावर अपघातांची मालिकाच दिसून आली.
गुरुवारी कामशेत खिंडीत मुंबई-पुणे लेनवर अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या म्हैशीला ठोकरले. त्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतर ती म्हैस गुरुवारपासून या लेनवरील रस्त्यातच पडून होती. तर शुक्रवारी सकाळी मृत म्हैस अचानक समोर दिसल्याने ट्रकचालकाने ब्रेक लावला असता ट्रकच्या पाठीमागून येणारे चारचाकी वाहन ट्रकवर आदळले. त्यानंतर या गाडीमागून येणाऱ्या आणखी दोन मोटारी आदळून अपघात झाला. अपघातांच्या या मालिकेनंतर अपघातानंतर मृत म्हैस जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यातून हटविण्यात आली आहे.