पुणे : ‘मराठी माणसांकडे आहे काय? आम्ही त्यांना आपटून मारू,’ अशा शब्दांमध्ये मराठीवर टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर सोमवारी शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांनी टीकेचा भडिमार केला. ‘तू महाराष्ट्रात ये म्हणजे तुलाच आपटून मारू,’ असा इशारा देण्यात आला.
हिंदी सक्तीविरोधात राज्य सरकारने माघार घेतल्यानंतर झालेल्या शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयी मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केला. हिंदी भाषेची सक्ती करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर झारखंडचे भाजपचे खासदार दुबे यांनी झारखंडमधूनच मराठीवर टीका केला. समाजमाध्यमांवर बोलताना त्यांनी, ‘मराठी माणसांकडे आहे काय? सगळ्या खाणी आमच्याकडे आहेत. टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी टॅक्स भरतात, त्यामुळे तुम्हाला भाकरी मिळते. आम्ही मराठीला आपटून मारू,’ असे वक्तव्य केले. त्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले.
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे व अन्य शिवसैनिक यात सहभागी झाले होते. मोरे, थरकुडे यांनी सांगितले की, दुबे हा भाजपचे प्यादे आहे. तो किरकोळ माणूस आहे. पक्षाच्या व्यासपीठावरून बोलता येत नाही, ते बोलण्यासाठी भाजपने अशी माणसे पाळली आहेत. मराठी म्हणजे काय आहे ते दुबे महाराष्ट्रात आल्यावर त्याला दाखवू. मात्र, त्याच्यात तेवढी हिंमत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या शहर कार्याध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे यांनीही दुबेवर टीका केली. तुम्ही काय मराठीला आपटणार? तू महाराष्ट्रात ये, आम्हीच तुला आपटून मारू, अशा तिखट शब्दांमध्ये रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. समाजमाध्यमावर बोलताना त्यांनी दुबे झारखंडमध्ये राहून बोलला आहे, त्याने महाराष्ट्रात यावे व हेच बोलून दाखवावे, असे आव्हान दिले.