खिशात चपटी अन् OLA चा ड्रायव्हर! गोपीचंद पडळकरांनी व्हायरल केला पुण्यातील व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:18 IST2022-02-03T13:30:48+5:302022-02-03T14:18:38+5:30
'मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय.'

खिशात चपटी अन् OLA चा ड्रायव्हर! गोपीचंद पडळकरांनी व्हायरल केला पुण्यातील व्हिडिओ
पुणे: देशातील मोठमोठ्या शहरांमध्ये ओला-उबेर इत्यादी ऑनलाइन टॅक्सी बुकींगचा मोठा प्रमाणात वापर होते. महाराष्ट्रातील मुंबई-पुणेसारख्या शहरांमध्ये याचा सर्रास वापर होतो. आरामदायी प्रवासासाठी लोक अशा टॅक्सींची बुकींग करतात. कंपन्यांनी चारचाकी टॅक्सीसोबतच आता मोटारसायकलवरुन प्रवाशांना सोडण्याची सोयदेखील केली आहे. पण, कधीकधी हा प्रवास आपल्या जीवावर बेतू शकतो. अशाच प्रकारची एक घटना पुण्यात घडली आहे..
पुण्यात ओला कंपनीची बुकींग घेणाऱ्या एका मोटारसायकल चालकाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या फेसबूकवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. एका प्रवाशाला घेण्यासाठी आलेला चालक दारुच्या नशेत आढळून आलाय. तसेच त्याच्या खिशातही देशी दारुची बाटली आढळल्याने अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
'मद्यधुंद सरकारपण प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय'
गोपीचंद पडळकर व्हिडिओ शेअर करत म्हणतात, 'ओला, उबेर, रेपिडो, झूम अशा ॲपचा वापर करुन सर्रास अवैधरित्या दुचाकी टॅक्सी म्हणून दुरूपयोग केला जातोय. मात्र हजारोचा टॅक्स भरणाऱ्या ॲटोरिक्षा चालकांच्या पोटावर लाथ मारली जातेय. परिवहन मंत्री अनिल परब व पालकमंत्री अजित पवार हे आपल्याच आशिर्वादाने होत आहे का? वसूलीचे लाभार्थी कोण? मद्यधुंद सरकारपण या चालकाप्रमाणेच तोकड्या पैशांसाठी प्रवाशांचा जीव धोक्यात घालतंय, आंदोलनाशिवाय यांचा नशा उतरणार नाही का?' असा सवाल पडळकर यांनी विचारला आहे.
स्थानिकांनी शेअर केला व्हिडिओ
काही स्थानिक तरुणांनी त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढला असून, याबाबत त्यांनी सरकार आणि अजित पवारांना जाबदेखील विचारला आहे. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती मी ओलाचा चालक असून, प्रवाशाला घेण्यासाठी आल्याचे सांगत आहेत. तसेच, मी दारुन पिऊन आलोय, असेही तो यावेळी सांगत आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे आहे.