पुण्याची झाली 'ड्रग्जनगरी'! तरुणींकडून वॉशरूममध्ये ड्रग्सचा झुरका? आणखी एक व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:18 PM2024-06-24T18:18:02+5:302024-06-24T18:18:28+5:30

रविवारी एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती...

Drugs in the washroom by young women? Another viral video from Pune crime news | पुण्याची झाली 'ड्रग्जनगरी'! तरुणींकडून वॉशरूममध्ये ड्रग्सचा झुरका? आणखी एक व्हिडिओ व्हायरल

पुण्याची झाली 'ड्रग्जनगरी'! तरुणींकडून वॉशरूममध्ये ड्रग्सचा झुरका? आणखी एक व्हिडिओ व्हायरल

- किरण शिंदे

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील L3 - Liquid Leisure Lounge हॉटेलमधील ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ बाहेर आला आणि त्यानंतर संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली. पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडले की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पुणे-अहमदनगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलच्या स्वच्छतागृहात दोन तरुणी ड्रग्स सदृश्य वस्तूचे सेवन करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ या मॉलमध्ये असणाऱ्या नामांकित पबमधील असल्याचा दावा केला जातोय.

रविवारी एफसी रोडवरील या पबच्या स्वच्छतागृहात अमली पदार्थांचे सेवन काही युवक करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा पब सील करण्याचे आदेश दिले होते. ‘झीरो टॉलरन्स’वर हे प्रकरण गांभीर्याने हाताळले जाईल, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले होते. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता हा तरुणी बाथरुममध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पुणे पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

एफसी रोडवरील व्हिडीओमुळे आणि तरुणींच्या या व्हिडिओमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एफसी रोडवरील पबमधील व्हिडीओमध्ये दिसणारी वेळ मध्यरात्री दीडनंतरची असल्यामुळे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून पहाटेपर्यंत पब सुरू असल्याचा आरोपसुद्धा करण्यात येत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलिस, उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिकेने कल्याणी नगरसह शहरातील विविध भागांतील पबवर कारवाईचा बडगा उगारला. फर्ग्युसन रोडवरील ‘द लिक्विड लिझर लाऊंज’ (एल ३) हा पब पहाटे पाचपर्यंत सुरू होता. यावेळी स्वच्छतागृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा केला जात आहे. त्याठिकाणी ड्रग्जचे सेवन केले गेले की नाही, या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाैकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पबमध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्यविक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेवू नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूचना पबचालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडीओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Drugs in the washroom by young women? Another viral video from Pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.