पुणे : प्रस्तावित पुरंदरविमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारे ड्रोन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सात गावांत होणाऱ्या भूसंपादनापैकी एखतपूर या गावातील जमिनींच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या सर्वेक्षणाला ग्रामस्थांना विरोध दर्शवीत ड्रोनच फोडले; परंतु पोलिसांच्या संरक्षणात अतिरिक्त दोन ड्रोनच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. पुढील दोन दिवसांत एखतपूर येथील संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील सात गावांपैकी एखतपूर या गावांत शुक्रवारी ड्रोन सर्व्हेला सकाळी सुरुवात झाली. मात्र, ड्रोन सर्वेक्षण सुरू होत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमावाने ड्रोन फोडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी चार वाजेनंतर आणखी दोन ड्रोन कॅमेरे मागवून घेतले. त्याद्वारे पुन्हा ड्रोन सर्वेक्षण सुरू करून सायंकाळी ते सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला.
याबाबत लांडगे म्हणाल्या, “आठ दिवसांपूर्वीच एखतपूर येथील ड्रोन सर्वेक्षण करण्याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना नोटीस दिल्या होत्या. त्यावेळी एकूण शेतकऱ्यांपैकी नव्वदपेक्षा अधिक जणांनी नोटीस स्वीकारली, तर उर्वरित शेतकऱ्यांनी नोटीस नाकारल्याने त्याच दिवशी ग्रामपंचायत कार्यालयात तलाठ्यामार्फत त्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्याशिवाय भूसंपादन करण्याबाबतची कलम ३२ (२) ची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देऊन ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले. शेतकऱ्यांनी ड्रोन कॅमेरा फोडल्याने त्यांच्याविरोधात पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा फोडल्याने पोलिसांच्या संरक्षणात सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे.”
ड्रोन सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. येत्या दोन दिवसांमध्ये या गावाची संयुक्त मोजणी करण्यात येईल. - वर्षा लांडगे, उपविभागीय अधिकारी, पुरंदर
पुरंदर विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनासाठी सात गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक गावामध्ये ड्रोन सर्वेक्षण करून तेथील मिळकतीसह अन्य बाबी निश्चित केल्या जातील. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत असला तरी सरकारच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी