बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:33 IST2025-09-08T19:33:38+5:302025-09-08T19:33:58+5:30
आता चालक ड्यूटीवर जाताना वाहकाकडे मोबाइल जमा करावा. तसेच ड्यूटी संपल्यावर वाहकांकडून मोबाइल परत घ्यावा, असा आदेश

बस चालवताना हेडफोन वापरल्यास चालकांचे निलंबन होणार; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय
पुणे : पीएमपीचे बसचालक गाडी चालविताना सर्रास मोबाइलचा वापर करतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बस चालविताना मोबाइल वापरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आता चालक ड्यूटीवर जाताना वाहकाकडे मोबाइल जमा करावा. तसेच ड्यूटी संपल्यावर वाहकांकडून मोबाइल परत घ्यावा, असा आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तसेच खासगी बस पुरवठादारांच्या चालकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे नियम लागू करण्यात आले आहेत. पीएमपीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत गंभीर तक्रार मांडली. काही बस चालक मोबाईलवर बोलत किंवा हेडफोनचा वापर करत असताना बस चालवत असल्याचे आढळले आहेत. यामुळे चालकांनी ड्यूटीवर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल त्या शेड्यूलवरील वाहकांकडे जमा करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. परंतु जे कोणी चालक मोबाइलवर बाेलताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खासगी बस पुरवठादारांनाही या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.