चालक-वाहकांनो पार्सल, वस्तूची ने-आण केल्यास होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:49 IST2025-02-11T10:49:25+5:302025-02-11T10:49:43+5:30
- सर्वसामान्यांची लालपरी झाली व्यावसायिक

चालक-वाहकांनो पार्सल, वस्तूची ने-आण केल्यास होणार कारवाई
- अंबादास गवंडी
पुणे : एसटी प्रशासनाकडून पार्सल, वस्तूची ने-आण करण्यासाठी एका खासगी कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. यामुळे जर कोणाला एखादी वस्तू जरी द्यायची असेल तर त्यांनी या कंपनीमार्फतच द्यावी. परंतु शालेय विद्यार्थ्यांचे डबे एसटीतून पाठविण्याची सोय आहे. परंतु कर्मचारी पार्सल नेताना आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे महामंडळाकडून नोटीस काढण्यात आले आहेत.
अनेकजण अचानक एखादे पत्र, औषध किंवा डबा द्यायचा असेल तर तो त्या भागातून जाणाऱ्या एसटीचे चालक अथवा वाहकाकडे देण्यात येत होता. कर्मचारीही ने-आण करत होते. पण आता सर्वसामान्यांची एसटी ही व्यावसायिक झाली आहे. त्यांच्याकडे दिलेली वस्तू हमखास आपण सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे जाते, इतका आत्मविश्वास असतो. ग्रामीण भागातील मुले शिक्षणासाठी, रोजगारासाठी, अभ्यासासाठी शहरी भागात सकाळीच येतात. पण सध्या नव्या नियमामुळे अनेक वाहक आणि चालक हे डबा किंवा महत्त्वाची औषधे, तत्काळ पोहोचविण्याची कागदपत्रेही नेत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची अडचण होत आहे.
शिवाय कंपनीकडून कुरिअर, साहित्य इत्यादी वस्तू वाहकाने काळजीपूर्वक नेणे आवश्यक आहे. या वस्तू गहाळ झाल्यास किंवा खराब झाल्यास त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यावर असणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
खासगी कंपनीला टेंडर
एसटी प्रशासनाकडून २०२७ पर्यंत एका खासगी कंपनीला टेंडर देण्यात आले आहे. यासाठी बसस्थानकावर पार्सल कार्यालय सुरू आहे. येथून जी पार्सल मिळतात ती वाहकांनी काळजीपूर्वक न्यावी. अवैधरीत्या पार्सल नेऊ नये. तसे नेल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एसटीच्या चालक-वाहकांना शालेय विद्यार्थ्यांचे डबे नेण्यास बंदी नाही. परंतु पैसे घेऊन अवैधरीत्या ज्वलनशील वस्तू, पार्सलची ने-आण केले तर चालक आणि वाहकांवर कारवाई करण्यात येईल. - प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग