डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 19:12 IST2019-01-22T19:10:49+5:302019-01-22T19:12:40+5:30
एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे.

डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ
पुणे : एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे या प्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. माझ्या विरोधात कोणताही पुरावा नाही. पुणे पोलिसांनी गोवा येथील घरात घेतलेला शोधही विनावॉरंट घेण्यात आला आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, असा अर्ज डॉ. तेलतुंबडे यांनी न्यायालयात केला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवादी संबंध असल्याचे संशयावरून तेलतुंबडे यांच्यावर विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांना सर्वाेच्च न्यायालयाने चार आठवडयांचा दिलासा देत, अटकपूर्व जामिनासाठी संबंधित जिल्हास्तरीय न्यायालयात दाद मागावी असे सांगितले आहे. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रात अर्जदार तेलतुंबडे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.