पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाची गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात विशेष सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात शासकीय गुपिते अधिनियमातील तरतुदींची पूर्तता न केल्याने हे प्रकरण विशेष प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे पाठविण्यात आले होते. मात्र, आता कायद्यातील तांत्रिक बाबींची पूर्तता झाली असून, खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालयातच चालणार आहे.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ताला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. कुरुलकर याच्याविरोधात शासकीय गुपिते अधिनियमाच्या कलमांनुसार मुंबई येथील काळाचौकी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानंतर डॉ. कुरुलकरला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दि. ४ मे २०२३ ला अटक केली होती. या प्रकरणात दोन हजार पानांचे आरोपपत्र एटीएसने विशेष न्यायालयात दाखल केले होते. त्यामध्ये डॉ. कुरुलकर व दासगुप्ता यांच्या चॅटिंगमधून संवेदनशील माहिती पुरविल्याचे उघड झाले होते. मात्र, ‘एटीएस’ने थेट विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यामुळे शासकीय गुपिते अधिनियमाच्या कलम १३ चे पालन न झाल्याने खटल्याच्या कार्यवाहीत मूलभूत कायदेशीर त्रुटी असल्याचा मुद्दा बचाव पक्षातर्फे ॲड. ऋषीकेश गानू आणि ॲड. राघव पुराणिक यांनी उपस्थित केला होता. या कायद्यानुसार, सरकार किंवा अधिकृत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तक्रार दाखल झाल्यानंतरच न्यायालयाने गुन्ह्याची दखल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष न्यायालयाने एटीएसला सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यासमोर आरोपपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याची तांत्रिक पूर्तता झाल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा खटला विशेष सत्र न्यायालयाकडे पाठविला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात कुरुलकर याने दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज अंतिम निर्णयाच्या टप्प्यावर असून, त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
Web Summary : Pradeep Kurulkar's trial for leaking secrets to a Pakistani agent resumes in special court after procedural issues were resolved. His discharge application nears decision; charges will then be framed.
Web Summary : प्रदीप कुरुलकर का पाकिस्तानी एजेंट को गोपनीय जानकारी लीक करने का मामला विशेष अदालत में फिर शुरू; प्रक्रियात्मक मुद्दे सुलझे। दोषमुक्ति याचिका पर फैसला जल्द; आरोप तय होंगे।