डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या याचा तपास केला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 11:00 IST2023-02-16T10:59:36+5:302023-02-16T11:00:48+5:30
खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या याचा तपास केला का?...

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या याचा तपास केला का?
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या खिशातील चाव्या कोणत्या खोलीच्या किंवा कपाटाच्या होत्या हे पाहिले का? सकाळी लोंढे नावाचा पोलीस त्याठिकाणी कसा आला? त्याठिकाणी पडलेल्या गोळ्यांवर केएफ (खडकी फॅक्टरी) असा मार्क आहे, तिथं खडकी फॅक्टरीमधून गोळ्या कशा आल्या याचा तपास केला का? असे विचारले असता ‘नाही’ असे उत्तर डेक्कनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरी़क्षक व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मनोहर जोशी यांनी उलटतपासणीदरम्यान दिले, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील अँड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर कोर्टात सुरू आहे. या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडे, ॲड. संजीव पुनोळकर आणि विक्रम भावे यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. यावेळी डेक्कनचे तत्कालीन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांची उलट तपासणी ॲड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बुधवारी (दि.१५) घेतली.
२ मार्चला पुढील सुनावणी
बचाव पक्षातर्फे जोशी यांची उलटतपासणी पूर्ण झाली. दरम्यान, जोशी यांना तपास कधी हस्तांतरित केला, तो करताना कोणती कागदपत्रे दिली, कुणाकुणाची स्टेटमेंट घेतली या विषयी उलटतपासणी झाली असल्याचे सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सांगितले. पुढील सुनावणी दि. २ मार्च रोजी होणार आहे.