Dr. Ketan Khurjekar from Sancheti Hospital died in the Express-Way accident | मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील व्हॉल्वो बसच्या धडकेत संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वरील व्हॉल्वो बसच्या धडकेत संचेती हॉस्पिटलचे डॉ. केतन खुर्जेकर ठार

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर व्हॉल्वो बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात संचेती हॉस्पिटलमधील स्पाईन सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचा मृत्यू झाला. हा अपघात एक्सप्रेस वेवर रविवारी रात्री साडेदहा वाजता तळेगावजवळ झाला. अपघातात डॉ. केतन खुर्जेकर यांच्यासह गाडीचा चालकही ठार झाला असून दोन निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. 

डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर (वय ४४), चालक ज्ञानेश्वर विलास भोसले अशी मृत्यू पावलेल्यांची नावे असून जयेश बाळासाहेब पवार व प्रमोद भिल्लारे (सर्व रा. पुणे) हे जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती अशी, डॉ. केतन खुर्जेकर व अन्य दोन डॉक्टर हे मुंबईला एका मेडिकल कॉन्फरन्सला गेले होते. तेथून ते परत येत असताना तळेगावजवळ त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. गाडी कडेला घेऊन चालक टायर बदलत होता. त्याला मदत करण्यासाठी डॉ़ खुर्जेकर हे त्याच्या शेजारी उभे होते तर दोन डॉक्टर मागच्या बाजूला उभे होते. त्याचवेळी मुंबई बाजूकडून वेगाने व्हॉल्वो बस आली. तिने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या या गाडीसह चौघांना उडविले. त्यात गाडीचालक व डॉ. केतन खुर्जेकर हे जागीच ठार झाले. अन्य दोन डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. 

याबाबत डॉ. के. एच. संचेती यांनी सांगितले की, अतिशय दुदैवी घटना असून आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मेडिकल कॉन्फरन्समध्ये डॉ. केतन खुर्जेकर व दोन निवासी डॉक्टर मुंबईत ऑपरेशनचे प्रेझेंटेशन करण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. डॉ़ केतन हे मनमिळावू होते. सर्वांचे ते हसून स्वागत करायचे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dr. Ketan Khurjekar from Sancheti Hospital died in the Express-Way accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.