पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे. डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते. त्यांच्या निधनानं ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे. अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
जगद्विख्यात खगोलशास्त्रज्ञ, माणूस, सृष्टी आणि विज्ञान यांच्यातील नात्याचा संवेदनशील धागा आणि संवेदनशील साहित्यिक-लेखक पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्रातील कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान मोहरा हरपला आहे. आपल्या अनोख्या आणि सोप्या संवादशैलीतील लेखनातून सामान्य माणसाला विज्ञानाचे ज्ञान देणारे डॉ. नारळीकर हे महाराष्ट्राच्या ज्ञान-विज्ञान परंपरेचा एक महत्वाचा आदर्श होते. केवळ भूगोलच नव्हे, तर अवघ्या खगोलाची ओळख करून घेण्याच्या आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याच्या अखंड ध्यासाने पछाडलेल्या डॉ.नारळीकर यांनी आपले संपूर्ण जीवन संशोधनासाठी समर्पित केले. विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्वयंसिद्ध मार्गदर्शक या नात्याने त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र संपन्न झाला. पुणे येथे त्यांनी स्थापन केलेल्या आंतरविश्व विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्राने विज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांचे योगदान, ज्ञानदान आणि समर्पित संशोधनवृत्ती हा भावी पिढ्यांसाठी सदैव आदर्श राहील. डॉ. नारळीकर यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.
अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनानं ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. डॉ. जयंत नारळीकर जागतिक किर्तीचे वैज्ञानिक तसंच विज्ञानवादी विचार समाजात रुजवणारे कार्यशील विचारवंत होते. भौतिक विज्ञान, खगोल विज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी स्थापन केलेली ‘आयुका’ संस्था ही देशाचं ज्ञानवैभव ठरली आहे. वैज्ञानिक क्षेत्रात स्थूलविश्वाचा उगम व बदलत्या स्वरूपावरच्या संशोधनामुळे जागतिक वैज्ञानिकांमध्ये ते आदरस्थानी होते. 'क्वासी स्टेडी स्टेट थिअरी'संदर्भातील त्यांचं संशोधन मैलाचं दगड ठरलं आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेला विज्ञानवादी दृष्टीकोन, अंधश्रद्धेवरचा प्रहार कायम स्मरणात राहील. ‘महाराष्ट्रभूषण’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’सारख्या मान-सन्मानानं गौरवान्वित डॉ. जयंत नारळीकरांचं निधन ही देशाची कधीही न भरून येणारी हानी आहे. त्यांनी सुरु केलेलं विज्ञानप्रसाराचं कार्य पुढे सुरु ठेवणं, विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात, विशेष करुन भावी पिढीमध्ये रुजवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.