dont take hindu- muslim, ram mandir- babri musjid subjects in firodia karandak ; new rule | हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली
हिंदू - मुस्लिम, राम मंदिर - बाबरी मस्जिदवरील विषय नकाे ; फिराेदिया करंडकाची नियमावली

पुणे : पुण्यातील नाट्यवर्तुळात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या फिराेदिया करंडक विविध गुणदर्शन स्पर्धेत यंदा नवीन नियमांची भर घातली आहे. यावर्षी सादर हाेणाऱ्या एकांकिकांमध्ये हिंदू – मुसलमान, जम्मू व काश्मीर, कलम३७ ०/३५अ, भारत पाकिस्तान, राम मंदिर – बाबरी मस्जिद या बाबतचे कुठलेही विषय, इतर कुठल्याही जाती धर्माबाबत भाष्य करणाऱ्या विषयांवर सादरीकरण करु नये अशी अट फिराेदियाच्या आयाेजकांकडून महाविद्यालय संघांना घालण्यात आली आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारी स्पर्धा म्हणून फिराेदिया करंडक स्पर्धेकडे पाहिलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेने पुण्यातील नाट्यवर्तुळात नाव कमावले आहे. या स्पर्धेत नाटकासाेबतच इतर कलांना देखील महत्त्व दिलेले असल्याने ही स्पर्धा इतर नाट्यस्पर्धांपेक्षा वेगळी ठरते.  यंदा हाेणाऱ्या स्पर्धेसाठी आयाेजकांनी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संवेदनशील विषयांवर एकांकीका सादर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यात हिंदू – मुसलमान, जम्मू व काश्मीर, कलम३७ ०/३५अ, भारत पाकिस्तान बाबत कुठलेही विषय, राम मंदिर – बाबरी मस्जिद आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. 

याविषयी बाेलताना फिराेदिया करंडक स्पर्धेचे संयाेजक अजिंक्य कुलकर्णी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सादरीकरणामध्ये तेचतेच विषय हाताळले जात हाेते. संवेदनशील विषयांची मांडणी करताना विद्यार्थ्यांकडून काही आक्षेपार्ह सादरीकरण हाेण्याची शक्यता असते.  जाती धर्मामध्ये तेढ निर्माण हाेईल अशा विषयांवर आणि सध्याच्या संवेदनशील विषयांवर सादरीकरण करु नये असे आम्ही नियमावलीत म्हंटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतर नवनवीन विषय तसेच त्यांच्या आयुष्याशी निगडीत विषय हाताळावेत अशी आमची इच्छा आहे. तसेच या नियमावलीवर अद्याप कुठल्याही संघाने आक्षेप नाेंदविलेला नाही. 

नाव न लिहीण्याच्या अटीवर एका नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणाला, हे नियम म्हणजे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एकप्रकारे गदा आणल्यासारखे आहेत. काही महाविद्यालये यातील काही विषय घेऊन सादरीकरण करणार हाेते, त्यांना त्यांचे विषय बदलावे लागणार आहेत. त्यामुळे या नियमांचा फेरविचार हाेणे गरजेचे आहे.

Web Title: dont take hindu- muslim, ram mandir- babri musjid subjects in firodia karandak ; new rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.