अतुल चिंचली-
पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आमच्या सारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून सर्व काही पूर्वपदावर आले आहे. परंतु आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळाली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आम्हाला पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीतीच वाटू लागली आहे, पण सरकार मायबापा...पुन्हा लॉकडाऊन नको! असे कळकळीची विनंती व्यावसायिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
देशात संचारबंदी लागू झाल्यावर सर्वात जास्त सरबत, उसाचे गुऱ्हाळ, चांबार, खाद्यपदार्थ गाडी चालवणारे, स्टॉलवरील चहा विक्रेते, चणे फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना बसला आहे.
ही लोक महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच पराराज्यातून पुण्यात व्यवसाय करण्यासाठी येत असतात. लहान व्यवसायातून त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. परंतु अशा अचानक ओढवलेल्या संकटाने त्यांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जाते. व्यवसाय पूर्वपदावर येत असताना डोक्यावरील कर्ज कमी होण्याबरोबरच पोटापाण्याचे प्रश्न सुटू लागतात. परंतु कोरोनाचे सावट अजून असल्याने त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे.
फळ आणि भाजी विक्रेत्या सुरेखा शिंदे म्हणाल्या, मागच्या वर्षी आमच्यावर कोरोनामुळे गावी जाण्याची वेळ आली. गावी जाऊन राशन भरण्यासाठी आम्हाला कर्ज काढावे लागले. जवळपास सात महिने आर्थिक चणचण भासत होती. त्यामध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. दवाखान्याच्या खर्चही वाढत गेला. महिन्याभराच्या कमाईत ६० टक्के घट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये असेच आमचे म्हणणे आहे. .........................
कोरोनाच्या संचारबंदीत काही महिने व्यवसाय बंद झाल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. काही महिन्यांनी हळूहळू पूर्वपदावर येत असताना लॉकडाऊन जर जाहीर झाला तर जगणे कठीण होईल. राजू वरछाये, चांभार
..........उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण मागच्या वर्षी ऐन हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. वर्षभरात ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण गेल्या वर्षी तर कर्जाचा डोंगरच उभा राहिला.कोरोना संकट पुन्हा घोंघावू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. पांडुरंग फडतरे, उसाचा रस विक्रेते