देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:44 IST2019-03-11T18:27:22+5:302019-03-11T18:44:07+5:30
मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपलं समाजकार्य सुरूच आहे. समुद्राची लाट वगळता मला कोणतीच लाट माहित नाही असं खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

देशाचं माहीत नाही, साताऱ्यात फक्त मीच जिंकणार - उदयनराजे
पुणे - येत्या लोकसभा निवडणुकीत काय होईल सांगता येत नाही, मात्र साताऱ्यात मीच जिंकणार असा विश्वास साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी बोलताना हा संवाद साधला.
मागील काही दिवसांपासून उदयनराजे कोणत्या पक्षाची उमेदवारी घेणार याबाबत विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून छत्रपती उदयनराजे भोसले यानांच पुन्हा संधी दिली जाणार असल्याचं स्पष्ट झालं.
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपलं समाजकार्य सुरूच आहे. समुद्राची लाट वगळता मला कोणतीच लाट माहित नाही असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत भविष्यात देशात काँग्रेस आघाडीची सत्ता आली तर पवारसाहेबांना संधी मिळायला हवी अशी इच्छा राजे यांनी व्यक्त केली.
तसेच पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले संबंध चांगले असल्याचा प्रश्न विचारताच माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी घनिष्ठ संबंध आणि मैत्री आहे असं उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंह भोसले आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजांमधील वाद संपुष्टात आणण्यासाठी शरद पवार यांना यश आले असून सातारा लोकसभा जागेवर उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले. आज पत्रकार परिषदेत पवारांच्या शेजारी उदयनराजे भोसले बसलेले पाहायला मिळाले.