पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार; पुरातन काळापासून प्रथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 18:44 IST2025-01-12T18:43:57+5:302025-01-12T18:44:18+5:30
या व्यवहारामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, दिवसेंदिवस खरेदी-विक्री कमी होऊ लागली आहे.

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजार; पुरातन काळापासून प्रथा
जेजुरी : पौष पौर्णिमा खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त गडकोटाच्या पायथ्याशी असलेल्या बंगाली पटांगणात गाढवांचा बाजार भरला आहे. बाजारात गुजरात (काठेवाड), राजस्थान व महाराष्ट्र (गावठी), आदी १५०० हून अधिक विविध प्रकारच्या जातींची गाढवे दाखल झाली आहेत. दरम्यान, बाजारात खरेदी-विक्रीतून दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाली आहे.
श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत पौष पोर्णिमेनिमित्त पुरातन काळापासून गाढवांचा बाजार भरतो. यामध्ये माती वडार, गाडी वडार, मदारी, गारुडी, माकडवाले, कैकाडी, परीट, बेलदार, वडार, कुंभार, आदी समाजबांधव राज्याच्या विविध प्रांतांतून दाखल होत गाढवे खरेदी करतात. या व्यवहारामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र, दिवसेंदिवस खरेदी-विक्री कमी होऊ लागली आहे. जेजुरीत गाढवांच्या पारंपरिक बाजारात काठेवाड, गावठी आणि विविध प्रकारची हजारो गाढवे दाखल होत असतात.
दातांवरून गाढवाचे वय ठरवले जाते. चार दात असलेल्या पशूला ‘चौवान,’ तर दोन दात असलेल्यास ‘दुवान’ म्हटले जाते. अक्कर म्हणजे ज्याला दात आलेले नाहीत असे छोटे पशू, यांना त्या मानाने किंमत कमी मिळते. काठेवाड (गुजरात) पशूची किंमत ५० ते ७० हजार रुपये; तर महाराष्ट्रीय गावठी पशूची किंमत २० ते ३५ हजार रुपये मिळत आहे. याबाबत कंधार (जि. नांदेड) येथून गाढवे खरेदीसाठी आलेले किसन गोविंद तेलंगे यांनी सांगितले की, यंदा पशूंच्या किमती आवाक्याबाहेर असून, नर कमी आणि मादी पशू विक्रीसाठी आलेल्या आहेत. काठेवाडी गाढव हे उंच, कणखर, ओझी वाहण्यासाठी मजबूत असल्याने त्यांची किंमत जास्त असल्याचे कोल्हार (जि. अहिल्यादेवीनगर) येथून आलेल्या दत्तू जाधव यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी आंध्र राज्यातील काही व्यापारी मांसविक्रीसाठी गाढवे खरेदी करण्यास येत होते. मात्र आम्ही संघटित होऊन त्यांना विरोध केल्याने ते आता फिरकत नसल्याचे सुभाष गायकवाड यांनी सांगितले.
पौष पौर्णिमा उत्सव व येथील बाजाराला मोठी परंपरा आहे. कायमस्वरूपी जागा राखीव ठेवावी व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीसाठी सोमवारी (दि. १३) नामदार जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. - रामा यल्लप्पा काळे, येडशी, जि. धाराशिव