दाेन किडनी, यकृताचे दान; अवयवदानाने वाचवले तीन जणांचे प्राण
By ज्ञानेश्वर भोंडे | Updated: January 28, 2024 18:05 IST2024-01-28T18:05:03+5:302024-01-28T18:05:26+5:30
भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्न केले

दाेन किडनी, यकृताचे दान; अवयवदानाने वाचवले तीन जणांचे प्राण
पुणे : एकीकडे देश प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा हाेत असताना दुसरीकडे तीन रुग्णांना आरोग्याची स्वसत्ता मिळवून देण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते आणि त्याला यश आले. भारती हॉस्पिटल येथे ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन डेड झाला. त्याच्या कुटूंबियाने अवयव दानाला परवानगी दिल्याने दाेन किडनी आणि यकृत असे अवयव मिळाल्याने तीन जणांचे जीव वाचले.
भारती हॉस्पिटल वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे, आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाची टीम यांनी ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. एम.व्ही. परमेश्वरन व भरत पंजाबी यांनी कुटुंबास मानसिक आधार दिला. नातेवाईकही अवयवदानस तयार झाले. त्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डीनेशन सेंटरच्या आरती गोखले यांनी ईतर हॉस्पिटल बरोबर समन्वय साधून अवयव दिले.
त्यानुसार एक किडनी भारती हॉस्पिटल येथील रुग्णास देण्यात आली. दुसरी किडनी अपोलो हॉस्पिटल नाशिक येथे देण्यात आली. लिव्हर म्हणजे यकृत ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर येथे देण्यात आले. तर डोळ्यातील कॉर्निया भारती हॉस्पिटल आय बँकेत ठेवण्यात आला आहे. मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपाने ती व्यक्ती जीवंत राहणार असून यथावकाश कॉर्निया वापरल्यावर त्या डोळ्यातून एखादा अंध जग पाहू शकणार आहे.
भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले. आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी, उपवैदयकीय संचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांचे मार्गदर्शन मिळाले. भारती हॉस्पिटल अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, भुलशास्त्र विभाग, युरो सर्जरी, नेफ्रॉलॉजी, न्यूरोलॉजी आणि वैद्यकीय समाजसेवा विभाग यांच्या संयुक्त प्रयत्न केले.