डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:57 IST2025-03-31T13:57:02+5:302025-03-31T13:57:58+5:30
‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही, माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नाही, हे ऐकून महिलेला बसला धक्का

डॉक्टरचा अजब कारनामा; पहिला विवाह लपवून दुसरा विवाह, महिलेकडून ३ लाखांची कारही घेतली
पुणे: पहिला विवाह झाल्याचे लपवून ठेवत दुसरा विवाह करून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका डाॅक्टरसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिलेने याबाबत तिच्या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एका महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, डाॅक्टरसह त्याच्या कुुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डाॅक्टरचा पहिला विवाह झाला होता. त्याचे पत्नीबरोबर पटत नसल्याने दोघे वेगळे राहत होते. घटस्फोट झालेला नसताना डाॅक्टरने फिर्यादी महिलेशी डिसेंबर २०१६ मध्ये दुसरा विवाह केला. त्यानंतर, डाॅक्टर आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेचा छळ सुरू केला.
कार खरेदीसाठी महिलेकडून तीन लाख रुपये घेण्यात आले. नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. ‘तुझा माझ्याशी कायदेशीर विवाह झाला नाही. माझा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला नाही,’ असे डाॅक्टर पतीने महिलेला सांगितले. त्यानंतर, तिला धक्का बसला. तिने वकील ॲड.सत्या मुळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी या प्रकरणी डाॅक्टरसह त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला.