पुणेकरांनो तुमच्याकडे PUC आहे का? नसेल तर तातडीने काढा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 14:38 IST2023-02-27T14:38:10+5:302023-02-27T14:38:19+5:30
शहरातील वाहने हीदेखील प्रदूषणात भर टाकत असल्याने आरटीओचा मोठा निर्णय

पुणेकरांनो तुमच्याकडे PUC आहे का? नसेल तर तातडीने काढा, अन्यथा...
पुणे : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. शहरातील वाहने हीदेखील प्रदूषणात भर टाकत असल्याने आरटीओ कार्यालयाकडून पीयूसीची कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सर्व वायुवेग पथकांना दिले आहेत.
पुणे शहरात ४४ लाखांपेक्षा अधिक वाहने आहेत. त्यापैकी फक्त नऊ लाख वाहनचालकांनीच पीयूसी काढला आहे. त्यामुळे शहरात प्रदूषण वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पीयूसी नसलेल्या दुचाकीला दाेन हजार तर चारचाकीला चार हजारांचा दंडदेखील ठोठावण्यात येणार आहे. शहरात २८८ पीयूसी केंद्र आहेत. दुचाकीसाठी ५० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी १२५ ते १५० रुपये पीयूसी काढण्यासाठी खर्च येतो.
धडक कारवाईला सुरुवात
मोटार वाहन कायद्यातील कलम ११५/१९० आणि ११६ / १९० नुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पुणे शहरासह पुणे विभागात ही धडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी तत्काळ वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन आरटीओने केले आहे.
वाहनचालकांनी पीयूसी काढणे अत्यंत गरजेचे
सर्व वाहनचालकांनी पीयूसी काढणे अत्यंत गरजेचे आहे. शहरातील ३५ लाख वाहनचालकांकडे पीयूसीच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आम्ही सर्व वायुवेग पथकांना पीयूसीसंदर्भातील कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. - डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
दंड किती?
दुचाकी - दाेन हजार
तीनचाकी - दाेन हजार
चारचाकी - चार हजार