हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:13 IST2019-06-28T21:03:08+5:302019-06-28T21:13:12+5:30
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार! देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला.

हरिनामाच्या गजरात दिवे घाट सर..
सासवड : हरिओम विठ्ठला, ज्ञानोबा-माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट, माऊली, माऊली अशा अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार! देवा सांगा नमस्कार...’असे म्हणत शहरातील भक्तांनी निरोप दिला. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजून सात मिनिटांनी झेंडेवाडी येथे दाखल झाला.
दिवे घाटातील सह्याद्रीच्या कडा झालेल्या पावसामुळे हिरवाईने नटलेल्या होत्या. त्यामुळे वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येथे आली. अवघड असा दिवे घाट टाळ मृदुगांच्या गजरात भक्तिमय वातावरणात लिलया पार करण्यात आला.
दरम्यान, पुण्यातील विश्रांतीनंतर शुक्रवारी पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा होता. पण सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढही होती. महापूजा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्थ अॅड. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनंतर सकाळी साडेसहा वाजताच पालखीने सासवडच्या दिशेने मार्गस्थ केले. दुपारी वडकी येथे माऊलींना पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविण्यात आला. हडपसर येथे सकाळी विसावा घेतल्यानंतर दिवे घाटाची अवघड चढण सुरू झाली. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले. पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला. ज्ञानोबा माऊलींची पालखी शुक्रवारी संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली.
......
संत ज्ञानेश्वर यांचे धाकटे बंधू संत सोपानदेव महाराज यांची समाधी सासवड येथे असून रविवारी सोपानदेव यांची पालखी दुपारी साडेबारा वाजता पंढरपुरकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान माऊलींची पालखी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आज कºहा काठी विसावली. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला, राजे उमाजी नाईक यांचे जन्म गाव भिवडी, महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी येथे जवळच आहे. नारायणपुर, भुलेश्वर, कानिफनाथ या तीर्थ क्षेत्रामुळे या भागात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.