जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था, कमान पडून 4 मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:27 IST2018-12-16T02:26:37+5:302018-12-16T02:27:10+5:30
स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळादुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे.

जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था, कमान पडून 4 मुले जखमी
वाल्हे : पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील जिल्हा परिषद शाळेची कमान पडून शाळेतील चार मुले जखमी झाली आहेत. अशाच काही पुरंदर तालुक्यातील शाळांच्या धोकादायक इमारती आहेत. त्यात वाल्हे केंद्राच्या गायकवाडवाडी, अबाजीचीवाडी, मुकदमवाडी शाळांचा समावेश असून गायकवाडवाडीतील इमारत पावसाळ्यात सपूर्ण गळते. त्यामुळे स्लॅब काही प्रमाणात खाली आला असून, बाकी स्लॅब कधी कोसळेल हे सांगता येत नाही.
स्थानिक ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळादुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. तरी, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काही अनर्थ घडण्याअगोदर सदर शाळांची दुरुस्ती किंवा नवीन इमारतीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांसह शिक्षकांनी केली आहे. याबाबतचा सदर प्रस्ताव ग्रामपंचायतीला दिला असल्याची माहिती गायकवाडवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष रासकर यांनी दिली आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत पवार उपस्थित होते.
सरपंच अमोल खवले यांनी घटनास्थळी भेट देऊन इमारतीची पाहणी करून मुलांना या खोलीमध्ये बसवू नये, असे शिक्षकांना सांगितले. सदर इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लवकरात लवकर पंचायत समितीकडे पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.