हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडचा वाद शिगेला; शेतकऱ्यांनी दिला सोलापूर हायवे अडवण्याचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:57 IST2021-06-09T13:57:27+5:302021-06-09T13:57:35+5:30
रिंगरोडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या ताब्यात जाणार, शेतीतून नेल्यास रिंगरोडला शेतकऱ्यांचा विरोध

हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडचा वाद शिगेला; शेतकऱ्यांनी दिला सोलापूर हायवे अडवण्याचा इशारा!
पुणे: पूर्व हवेली मधील शिंदवणे, तरडे वळती आणि कोरेगाव मूळ या गावातून रिंगरोड जाणार आहे. रिंगरोडसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या ताब्यात जाणार आहेत. त्याबदल्यात शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे. पण हा मोबदला आम्हाला किती दिवस पुरणार? असा सवाल इथल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पण जर रिंगरोड शेतकऱ्यांच्या शेतातून गेला तर सोलापूर हायवे अडवण्याचा इशारा सरपंच अण्णा महाडिक आणि शेतकऱ्यांनी दिला आहे.
याठिकाणी संबंधित अधिकारी जागेची मोजणी करण्यासाठी येणार होते. पण त्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की, मोजणीच्या ठिकाणी या गावांमधील शेतकरी एकवटले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मोजणीसाठी येणार नसल्याचे कळवले. हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडवरुन वाद आता पेटला आहे.
हवेलीच्या पूर्व भागातील 103 किमी लांबीच्या 825 हेक्टर जागेसाठी 15 दिवसात रिंगरोड बनवण्यासाठी मोजणी सुरू होईल. त्यानंतर दोन महिन्यांनी प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रस्ते विकास महामंडळाचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील यांनी ठेवले आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर मोजणीसाठी अधिकारी येणार म्हणून सर्व गावचे शेतकरी या ठिकाणी गोळा झाले होते. या अधिकाऱ्यांना ही माहिती समजल्यानंतर अधिकाऱ्यांनी येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांशी फोन वरून चर्चा करून शेतकऱ्यांबद्दलची हकीकत संदीप पाटील यांना सांगितली आणि रिंगरोड शेतकऱ्यांच्या जमिनींमधून न नेता गावच्या शिवेवरून न्यावा अशी मागणी अण्णा महाडिक यांनी केली आहे.