पुण्यात मानाचा चौथा गणपती तुळशीबागचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद; परवानगी नसताना केलं ढोल वादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 16:34 IST2021-09-19T13:34:41+5:302021-09-19T16:34:33+5:30
आम्ही रीतसर २ - २ ढोल ताशांची परवानगी मागितली असं कार्यकर्त्यांनी सांगितलं

पुण्यात मानाचा चौथा गणपती तुळशीबागचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद; परवानगी नसताना केलं ढोल वादन
पुणे : गणेश विसर्जनाच्या दिवशी पुण्यात मिरवणूक, वादनाला परवानगी नसतानाही मानाच्या चौथ्या गणपतीसमोर ढोल वादन करण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आणि कार्यकर्ते, वादक यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
पुण्यात सकाळपासूनच मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम या तीन मानाच्या मंडळांनी जयजयकार करत बाप्पाला निरोप दिला. पण तुळशीबाग गणपतीसमोर ढोल, ताशांचे वादन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ढोल वादकांची नावं लिहून घेतली आहेत. तसेच ढोलही ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळं कारवाई होण्याची शक्यता असल्याच दिसून येत आहे. यावेळी कार्यकर्त्यानी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांना आम्ही परवानगी घेतल्याच सांगण्यात आलं आहे.
आले आले रे तुळशीबागवाले आले, मंगलमूर्ती मोरया च्या जयजयकार करत तुळशीबाग गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मंडळाचे नितीन पंडित म्हणाले, आता पोलिसांनी ढोल ताब्यात घेतले होते. आम्ही रीतसर २ - २ ढोल ताशांची परवानगी मागितली होती. त्यामुळं कारवाई होणार नाही. पोलिसांनी ढोल परत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
ढोल ताशा बंद केल्यावरही कार्यकर्त्यांचा जल्लोष
गणपतीसमोरील ढोल - ताशा वाजवणारे बंद झाल्यावर कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. तसेच गर्दी करून बाप्पाला निरोप देण्यात आला.