‘त्यांना’जराही आमची दया आली नाही का? गर्भवती महिलेची रखरखत्या उन्हात सुतारदरा ते नळ स्टॉपपर्यंत "पायपीट"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 00:22 IST2020-04-24T19:28:19+5:302020-04-25T00:22:31+5:30
'ती' च्या हाताला सलाईन लावल्याची पट्टी होती. ती खूप थकली होती..वजन केवळ 35 किलो...त्यातून दोन महिन्यांची गर्भवती..

‘त्यांना’जराही आमची दया आली नाही का? गर्भवती महिलेची रखरखत्या उन्हात सुतारदरा ते नळ स्टॉपपर्यंत "पायपीट"
नम्रता फडणीस/ तन्मय ठोंबरे
पुणे: ' ती' गर्भवती...ताप नि अशक्तपणा आल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेणे आवश्यक होते..मात्र गल्लीबाहेर बॅरिकेट्स लावलेले..गाडी असूनही जाता येत नसल्याने त्याने पोलिसांना बॅरिकेट्स काढून जाऊ देण्याची विनंती केली..मात्र पोलिसांनी नकार दर्शवित त्यांना चालत जाण्याचा अजब सल्ला दिला.मग काय, आपल्या गर्भवती सहचारीला सुतारदरा ते नळ स्टॉप पर्यंत चालत घेऊन जाण्याची वेळ त्याच्यावर आली...तिच्या अशा अवस्थेत भर उन्हात या दांपत्याला पायपीट करावी लागली...आजवर हे चित्र आपण केवळ दुर्गम भागातच पाहात होतो. मात्र पोलिसांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोरोना काळात पुण्यातील एका दांपत्यावर हा विदारक प्रसंग ओढवला.
त्यांना आमच्यावर जराही दया आली नाही का? असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
शुक्रवारी तीनच्या सुमारास हे दांपत्य कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात सावरकर उड्डाणपुलाच्या खाली बसलेले ' लोकमत' च्या छायाचित्रकाराला दिसले.त्याने त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांची ही दारुण व्यथा समोर आली. ' ती' च्या हाताला सलाईन लावल्याची पट्टी होती. ती खूप थकली होती..दोन महिन्यांची गर्भवती, त्यातून वजन केवळ 35 किलो असल्यामुळे तिला कमालीचा अशक्तपणा आला होता..तिला धड चालता देखील येत नव्हते. नळ स्टॉप जवळील डॉकटर ओळखीचे असल्यामुळे आणि त्यांनी सलाईन लावण्यास सांगितल्यामुळे ते दोघे घराबाहेर पडले होते. गर्भावस्थेतील आवश्यक तपासण्यासाठी या दाम्पत्याला घराबाहेर पडणे भाग पडले. परंतु पोलिसांनी त्यांना इतरांसारखीच वागणूक दिली. त्यांना दुचाकीवरून जाण्याची परवानगी नाकारली..पण जाणे तर आवश्यक होते. रिक्षा मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पायीच जाण्याचा मार्ग निवडला..हे दाम्पत्य सुतारदरा भागात वास्तव्यास आहे. तिथून त्यांना पायी दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास तब्बल दीड तास लागला...हे केवळ जाण्याचे अंतर...परत तितकाच पायी प्रवास सलाईन लावून आलेल्या त्या गर्भवती महिलेला करावा लागला.
कोरोनाच्या संकट काळात कडक शिस्त पाळली जाणे आवश्यकच आहे. पण अशा काही केसमध्ये नियम काहीसे शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत आणि पोलिसांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे.