'Dhadakebaj' director's 'jhapatlela' journey present on front of audience | ‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला
‘धडाकेबाज’ दिग्दर्शकाचा ‘झपाटलेला’ प्रवास उलगडला

ठळक मुद्देकोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते उदघाटन

पुणे : धडाकेबाज ते झपाटलेला, गुपचूप गुपचूप ते थरथराट अशा एकापेक्षा एक चित्रपटातील जबरदस्त अभिनय... त्याबरोबरीने सांभाळलेली निर्मितीची अन दिग्दर्शनाची बाजू... लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा हरहुन्नरी कलाकारांसोबत जमलेली मैत्री, त्याबरोबरीने उलगडत गेलेला अभिनय-दिग्दर्शनाचा महेश कोठारे यांचा प्रवास रसिकांना स्पर्शून गेला. 
चित्रपट यशस्वी होणे हे फक्त दिग्दर्शकाच्या हाती नसून यात प्रत्येकाचेच योगदान तितकेच महत्वाचे असते. मा या प्रवासात अनेकांनी साथ दिली, म्हणूनच मी या क्षेत्रात यशस्वीपणे काम करू शकलो अशी नम्र भावनाही त्यांनी व्यक्त केली. 
दिग्दर्शक महेश कोठारे यांचा एक अनोखा जीवन प्रवास '' याला जीवन ऐसे नाव'' या कोथरूड सांस्कृतिक महोत्सवातीलह्ण कार्यक्रमांद्वारे रसिकांसमोर आला  आणि या ८०च्या दशकापासून आजपर्यंत एक वेगळेच स्थान निर्माण करणा-या  या दिग्दर्शकाने  पुन:श्च रसिकांची मने जिंकली.   
आयडियल कॉलनी येथील मैदानावर संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, निलीमा कोठारे, नगरसेवक हेमंत रासने, मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, किरण दगडेपाटील, अभिनेते रमेश परदेशी, अक्षय टंकसाळे, अभिनेत्री रेशम टिपणीस,प्रवीण बढेकर, अमोल रावेतकर, हर्षद झोडगे,भावना व आनंद पटेल, नंदकुमार वढावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सावाच्या निमित्ताने दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल महेश कोठारे यांचा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देवून गौरव करण्यात आला. 
दिग्दर्शक महेश कोठारे यांचा जीवनप्रवास अमोल भगत प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडला. त्यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, रेशम टिपणीस, पुष्कर जोग, सई लोकूर, सावनी रवींद्र व प्रसन्नाजीत कोसंबी आदी कलाकार सहभागी झाले. दिग्दर्शक महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील गाणी, नृत्य, संगीत या माध्यमातून सजलेल्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. तसेच पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या कोठारे यांच्या मुलाखतीतून कोठारे यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर आले. त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी  काम करतानाचे अनेक किस्से मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर मोहोळ यांनी तर सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री यांनी केले. 
................

तात्या विंचुमुळे महाराष्ट्रात नवी ओळख मिळाली 
मी महेश कोठारे यांच्याबरोबरीने तीन चित्रपट केले. पण, तात्या विंचूची भूमिका देऊन त्यांनी माझ्यातील खलनायक ओळखला आणि त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात माझी एक नवी ओळख निर्माण झाली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखून त्यांनी चित्रपटांची निर्मिती केली, म्हणूनच त्याच्यातील एक यशस्वी अभिनेता आणि दिग्दर्शक आजच्या प्रवासात टिकून असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली.
         
-----------------------------------------------------------

Web Title: 'Dhadakebaj' director's 'jhapatlela' journey present on front of audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.