कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 16:22 IST2025-07-01T16:21:24+5:302025-07-01T16:22:46+5:30
- महाड हद्दीतील दुरुस्तीची कामे पूर्णत्वास; प्रशासनाच्या नियोजन अभावाचा स्थानिकांसह पर्यटकांना फटका

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाळ्यात दरवर्षी वरंधा घाट बंद
भोर : मागील पाच-सहा वर्षांत भोर-महाड मार्गावरील विविध प्रकारच्या कामांसाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंद का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. दरड प्रवण क्षेत्राचे कारण दिले जात आहे. मात्र, प्रशासनाच्या योग्य नियोजनाच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे पर्यटक, प्रवासी, नागरिक, व्यापारी सांगत आहेत.
भोर-महाड रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. महामार्गाच्या निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधी व्यतिरिक्त मागील चार वर्षांत भोर व महाड तालुक्यांत वरंधा घाट परिसरात झालेल्या जमीन खचण्याच्या कामांसाठीदेखील कोट्यवधी रुपयांचा खर्च तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आला होता.
त्या पश्चात हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात आला. महाड हद्दीमधील मार्गाची दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, भोर हद्दीमधील नवीन रस्त्याची कामे सुरू असल्याचे राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले.
१६ जूनच्या लेखी पत्राने जिल्हाधिकारी पुणे यांनी आगामी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत या मार्गातून जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्याचा आदेश जाहीर केला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाकडून या कालावधीमध्ये रेड अथवा ऑरेंज अलर्ट नसेल तरच हलक्या गाड्यांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
या बाबींचा विचार करता या परिसरामध्ये दरड प्रवण क्षेत्र असल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात दरड पडून रस्ता बंद होणे, रस्ता खचणे हे प्रकार फारसे घडत नसल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाटाची पाहणी करून वाहतुकीस योग्य नसल्याचा अहवाल दरवर्षी दिला जातो आणी दर पावसाळ्यात तीन महिने घाट बंद असतो. हे मागील पाच ते सहा वर्षे सुरू आहे. पावसाळ्यात घाट बंद करून आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग व प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत? वरंधा घाट आता राष्ट्रीय महामार्गामध्ये गेला असतानासुद्धा त्यावर उपाययोजना करायची सोडून फक्त कागद पुढे करून जबाबदारी ढकलायचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिंदेवाडी-भोर महाड भोर हद्दीपर्यंतच्या ८१ किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ७२३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर महाड तालुक्यात हद्दीसाठी कोट्यवधी रुपये निधी मंजूर केला असतानाही प्रतिवर्षी वरंधा घाट बंद कशासाठी? घाट रस्ता सुरू राहावा आणि प्रवास सुलभ व्हावा म्हणून हा निधी खर्च केला असेल तर मग घाट बंद का? वरंधा घाटात कुठेही रुंदीकरणाचे काम सुरू नाही.
नाहक त्रास
भोर तालुक्यात देवघर ते वारवंडपर्यंत नवीन काम सुरू आहे. प्रशासनाकडून मात्र लोकांना कसा मानसिक त्रास होईल आणि महाबळेश्वरमार्गे पुणे अथवा ताम्हिणीमार्गे पुणे म्हणजे लोकांना फक्त नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड कसा होईल, असा विचार करत असावेत, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
उदरनिर्वाहाचा प्रश्न
भोर-महाड रस्ता बंद असल्यामुळे भाजीपाला, माल वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद आहेत, पर्यटक येत नाहीत, व्यावसायिक गाड्या जात नाहीत. त्यामुळे सदर रस्त्यावरील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या हाॅटेल व्यावसायिकांना धंदा नसल्याने मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे उबार्डे येथील हाॅटेल व्यावसायिक प्रकाश पवार यांनी सांगितले.
प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना न करता दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंदीमुळे भोर व कोकणातील नागरिकांना मोठा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासनाने तसेच संबंधित राष्ट्रीय महामार्ग व बांधकाम विभागाने याचा लेखी खुलासा द्यावा. - सचिन देशमुख, सामाजिक कार्यकर्ते