पुण्याच्या उपमहापाैरांना फ्रान्समध्ये सुखद अनुभव ; फ्रान्सच्या यंत्रणेला केला सलाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 14:45 IST2019-07-26T14:33:42+5:302019-07-26T14:45:07+5:30
पुण्याचे उपमहपाैर सिध्दार्थ धेंडे सध्या फ्रान्समध्ये असून तेथील एका रेल्वे स्टेशनवर त्यांना एक सुखद अनुभव आला आहे.

पुण्याच्या उपमहापाैरांना फ्रान्समध्ये सुखद अनुभव ; फ्रान्सच्या यंत्रणेला केला सलाम
पुणे : पुण्याचे उपमहपाैर सध्या फ्रान्समध्ये कुटुंबियांसह गेले आहेत. तेथे एका रेल्वे स्थानकावर त्यांना सुखद अनुभव आला. त्याचे वर्णन त्यांनी साेशल मीडियावर केले आहे. फ्रान्सच्या यंत्रणेचे मनापासून आभार मानून त्यांनी त्यांना सलाम केला आहे.
पुण्याचे उपमहापाैर सिद्धार्थ धेंडे सध्या कुटुंबीयांसाेबत फ्रान्समध्ये आहेत. तेथील टाेवलुस या शहरातील रेल्वे स्थानकावर त्यांना सुखद अनुभव आला. याबाबत त्यांनी एक फेसबुक पाेस्ट लिहीत फ्रान्सच्या यंत्रणेला सलाम केला आहे. धेंडे यांनी फेसबुक पाेस्टमध्ये लिहीलं आहे की, लुडस या शहरातून रेल्वेने टाेवलुस या शहराकडे आलाे. तेथून एक प्लॅटफाॅर्म बदलून दुसऱ्या प्लॅटफाॅर्मला जावून दुसऱ्या रेल्वेने लियान शहराकडे जायचे हाेते. आम्ही पाच लाेक हाेताे. त्यातील एका महिलेला चालता येत नव्हते. त्यामुळे त्या व्हीलचेअरवर हाेत्या. टाेवलुस रेल्वे स्टेशनवर लिफ्टची व्यवस्था दूर हाेती, त्यामुळे दुसऱ्या प्लॅटफाॅर्मवर जाईपर्यंत आमची ट्रेन निघून गेली. आम्हाला पुढचा प्रवास करता येणे शक्य नव्हते. आम्ही सर्व हताश झालाे हाेताे. काय करावे ते सुचत नव्हते. देश, भाषा सर्वच अनाेळखी.
त्यावेळी आमची ही अवस्था पाहून प्लॅटफाॅर्मवर उपस्थित असलेले रेल्वे कर्मचारी आमच्याजवळ आले व त्यांनी आमची विचारपुस केली. आमची कहाणी ऐकल्यावर आम्हाला धीर दिला आणि मदत केंद्राजवळ घेऊन गेले. तेथे आम्हाला तीन तास नंतरच्या ट्रेनचे बुकिंग करुन दिले. तसेच पुढील स्टेशनवर आमची राहायची तसेच जेवणाची व्यवस्था करुन दिली. या सर्व अनुभवनातून हा देश खरच का प्रगत आहे याची जाणीव झाली. नुसता भाैतिक विकास महत्त्वाचा नसून प्रत्येक व्यक्तिच्या मदतीकरीता यंत्रणा देखील विकसीत करणे आवश्यक आहे. अशी यंत्रणा येथे विकसित करण्यात आली असून ती सक्षमपणे कार्यांवित आहे, हे सत्य आहे.
पुढील प्रवासात आम्हाला एक पैसे ही अधिकचा खर्च करावा लागला नाही. पुढचे रेल्वेचे टिकीट, टॅक्सी, जेवण, हाॅटेलचा खर्च सर्व रेल्वे प्रशासनाने केला. तसेच त्यांचे कर्मचारी आम्हाला साेडायला शेवटपर्यंत आले. मी व माझे कुटुंबिय फ्रांन्स रेल्वेच्या मदत करणाऱ्या सर्व यंत्रणा तसेच आम्हाला सहकार्य करणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना धन्यवाद देताे व त्यांना सलाम करताे.