फलटण ते लोणंद मार्गावर धावणार डेमु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 12:24 IST2019-09-10T12:20:06+5:302019-09-10T12:24:41+5:30
लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते.

फलटण ते लोणंद मार्गावर धावणार डेमु
पुणे : मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या लोणंद ते फलटण रेल्वेमार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या मार्गावर दि. १२ सप्टेंबरपासून डेमु सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत काही महिन्यांपूर्वी या मार्गावरून रेल्वेगाडी सुरू करण्यात मान्यता मिळाली. त्यानंतर काही दिवसांपासून गाडीची चाचणीही घेण्यात आली. आता प्रत्यक्ष प्रवाशांसाठी दि. ११ सप्टेंबर रोजी फलटण येथे या गाडीचे लोकार्पण होणार आहे. तर नियमित सेवा दि. १२ सप्टेंबरपासून धावणार आहे. ही सेवा रविवार सोडून इतर सर्व दिवशी धावणार आहे. लोणंदहून ही गाडी सकाळी ७.२० वाजता सुटून ८.५० वाजता फलटण स्थानकात पोहचेल. तर फलटण स्थानकातून सकाळी ९.३० वाजता सुटून ११ वाजता लोणंदमध्ये दाखल होईल. दुसरी डेमु सकाळी ११.३५ वाजता लोणंद स्थानकातून सुटून दुपारी १.०५ वाजता फलटणमध्ये पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासात दुपारी १.४५ वाजता सुटून ३.१५ वाजता लोणंद स्थानकात येईल. ही गाडी तरडगाव व सुरवडी स्थानकातही थांबेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
तिकीटाची व्यवस्था केवळ लोणंद स्थानकात असणार आहे. फलटण व इतर दोन स्थानकांतून गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना गाडीतच तिकीट देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. गाडीमध्ये रेल्वे गार्डकडे तिकीटे उपलब्ध असतील. ही गाडी सुरू झाल्याने फलटण व लोणंददरम्यानच्या नागरिकांची मोठी सोय झाली आहे. दैनंदिन प्रवास करणारे नोकरदार, शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या मार्गावर डेमु धावणार असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने काळजी घ्यावी. तसेच जनावरांनाही रेल्वेमार्गावर दुर ठेवावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
....
मागील अनेक वर्षांपासून बारामती ते लोणंद या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ फलटण ते लोणंद दरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. फलटण ते बारामती मार्गासाठी जमीन मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा मार्ग रखडला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास परिसरातील नागरिकांसह रेल्वेलाही मोठा फायदा होणार आहे. दक्षिणेत ये-जा करणाऱ्या गाड्यांना सध्या पुणे स्थानकातून दौंडकडे जावे लागते. लोणंद-बारामती मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याकडे येण्याचा वळसा वाचणार आहे. या गाड्या थेट बारामतीवरून दौंडमार्गे पुढे जाऊ शकणार आहेत. त्यामुळे पुणे स्थानकावरील मोठा ताणही कमी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.