उरुळी कांचन : उरुळी कांचन हद्दीत दि.१४ ऑक्टोबर रोजी आढळलेल्या युवतीच्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल्ल यांनी दिली.
दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गगन आकांक्षा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. युवतीचे नाव पूनम विनोद ठाकूर (वय २०, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली, जि. पुणे) असे आहे. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून घटनास्थळी रक्ताचे डाग, मोबाईल आणि चप्पल पडलेली होती. या प्रकरणी तिचा भाऊ मनिष ठाकूर यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
घटनास्थळी तातडीने मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल्ल यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि उरुळी कांचन पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या चार स्वतंत्र पथकांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. तपासादरम्यान सुमारे ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच २०० हून अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित तरुण मोटारसायकलवरून घटनास्थळाच्या दिशेने जाताना दिसला. पुढील तपासात गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार संशयिताची ओळख दिनेश संजय पाटोळे (वय २६ रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन) अशी पटली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात उघडकीस आले की, युवती रोडने पायी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने तिच्याकडे शरीरिक संबंधांची मागणी केली असता युवतीने नकार देऊन विरोध केला. त्यावरून आरोपीने तिचा रागाच्या भरात डोक्यात दगड मारून खून केला. या प्रकरणात आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम एच १२ एस झेड - ६९६५ जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची २७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
ही यशस्वी कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी (कोल्हापूर परिक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या सूचनांनुसार करण्यात आली आहे.