इंदापुरात ऑनलाइन जंगली रमीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 12:44 PM2023-08-19T12:44:32+5:302023-08-19T12:45:05+5:30

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने या आंदोलनास पाठिंबा दिला होता...

Demand for permanent ban on online wild rummy in Indapur pune crime | इंदापुरात ऑनलाइन जंगली रमीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

इंदापुरात ऑनलाइन जंगली रमीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी

googlenewsNext

इंदापूर (पुणे) : ऑनलाइन जंगली रमी या गेमवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी या गेमची जाहिरात करणाऱ्या अभिनेते व क्रिकेटपटूंच्या मानधनाची सोय करण्याकरिता शिवसेनेचे शहराध्यक्ष व कार्यकर्त्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील दुकाने पालथी घालत शुक्रवारी (दि. १८) भीक मांगो आंदोलन केले. अंगावर कोरडे मारणाऱ्या पोतराजासह वाजतगाजत शहरातील झालेल्या या आंदोलनाने इंदापूरकरांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले होते. इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने या आंदोलनास पाठिंबा दिला होता.

यासंदर्भात अशोक देवकर यांनी सांगितले की, नामवंत अभिनेते, भारताचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेले क्रिकेटपटू ऑनलाइन जंगली रमीची जाहिरात करतात. या जाहिराती सतत मोबाइलवर चालू असतात. या जाहिरातींमधून अभिनेते, क्रिकेटपटू लाखो रुपये कमवत असतात. मात्र, याच जाहिरातींमुळे मोठ्या संख्येने या गेमकडे खेचले गेलेले असंख्य सुशिक्षित बेरोजगार कर्जबाजारी होतात. फसल्यानंतर आत्महत्याही करतात.

या दुर्दैवी प्रकाराला आळा बसावा यासाठी ऑनलाइन रमी गेमवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्यात यावी. या जाहिरातींना मुकणाऱ्या अभिनेते व क्रिकेटर यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही भीक मांगो आंदोलन केले आहे, असे देवकर यांनी स्पष्ट केले.

इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा.कृष्णा ताटे यांनी शिवसेनेच्या या भूमकेस पाठिंबा दिला आहे. शिवसेनेची ही मागणी रास्त आहे. आज इंदापुरात आवाज उठला. तोच राज्य व देशात उठावा. सर्वांनी एकजूट केली तर हे अशक्य नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Demand for permanent ban on online wild rummy in Indapur pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.