Delhi Pollution effects on air traffic | दिल्लीतील प्रदुषणाचा विमान वाहतुकीवर परिणाम
दिल्लीतील प्रदुषणाचा विमान वाहतुकीवर परिणाम

ठळक मुद्देदिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या काही विमानांनाही जवळपास दीड ते दोन तास विलंब

पुणे : नवी दिल्ली येथील प्रदुषणामुळे आकाशात धुक्याचा जाड थर तयार झाल्याने रविवारी (दि. ३) विमान वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणे ते दिल्लीदरम्यानचीविमानसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या दोन तर पुण्यातून एक विमान जयपुरकडे वळविण्यात आले. तर अनेक विमानांना विलंब झाला. 
प्रदुषणामुळे नवी दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर दाट धुके पसरले होते. त्यामुळे जवळच्या अंतरावरील दिसणेही कठीण झाले होते. या स्थितीमुळे वैमानिकांना विमानाचे उड्डाण करणे व उतरविणे अडचणीचे ठरत होते. परिणामी, दिल्ली विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांवर परिणाम झाला. एअर इंडियाच्या निवेदनानुसार, रविवारी सकाळी दाट धुक्यामुळे ३७ विमाने अन्य विमानतळांकडे वळविण्यात आली. तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लि.च्या प्रसिध्दी पत्रकामध्येही ही बाब नमुद करण्यात आली आहे. प्रामुख्याने सकाळी ९ ते १ यावेळेत उड्डाणांना मोठा फटका बसला. त्यानंतर या स्थितीत सुधारणा होत गेली.   
दरम्यान, पुण्यात ये-जा करणाऱ्या विमानांनाही याचा फटका बसला. दिल्लीतून सकाळी उड्डाण करणारे एअर इंडियाचे आणि इंडिगोचे विमान रद्द करण्यात आले. तसेच पुण्यातून सकाळी ७.३० वाजता उड्डाण केलेले स्पाईस जेटचे विमान जयपुरकडे वळविण्यात आले. दुपारी १.१० वाजता पुण्यातून उड्डाण करणाऱ्या विस्तारा कंपनीच्या विमानाला ४ तास विलंब झाला. तसेच गो एअर, इंडिया, एअर एशिया इंडिया कंपनीची काही विमाने १ ते २ तास उशिराने उ्डाण करत होती. दिल्लीतून पुण्याकडे येणाऱ्या काही विमानांनाही जवळपास दीड ते दोन तास विलंब होत होता. हे वेळापत्रक खोळंबल्याने अहमदाबाद, हैद्राबाद, कोलकाताकडे जाणाºया विमानांनाही विलंब झाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. 
-------------------

Web Title: Delhi Pollution effects on air traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.