पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार करण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय संतापजनक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिका सर्वसामान्य नागरिकांकडे १०-२० हजार रुपयांचा मिळकत कर थकला तरी थेट घरासमोर बॅंड वाजवते, मग दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा २७ कोटी मिळकत कर थकविला तरी बॅंड का वाजला नाही? सर्वसामान्य नागरिकांना एक आणि रुग्णालयाला वेगळा न्याय कसा, असा सवालही त्यांनी केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
महापालिका कार्यालयात विविध विकास कामांबाबत बैठक घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पत्रकारांशी बोलत होत्या. गर्भवती महिलेला रुग्णालयात साडेपाच तास बसवून ठेवले आणि १० लाख रुपयांची मागणी केल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई झालीच पाहिजे. मुंबईतील केईएम, सायन पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधून नामवंत डॉक्टर घडले आहेत.राज्य सरकार व महापालिकेच्या अखत्यारीतील संबंधित रुग्णालयांवर आता खर्च केला जात नाही. सार्वजनिक आरोग्य विभागात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. सुळे यांनी तनिषा भिसे यांच्या घरी जाऊन त्यांचे पती व कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला. ही अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणार घटना आहे. यात रुग्णालयाची चूक दिसत आहे. यात तनिष्का भिसे या महिलेची हत्या झाली असून, रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे. सरकार वाट कसली पाहत आहे. आता काय दहा समित्यांचा अहवाल घेत बसणार का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
लोकशाहीमध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकारउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना माझ्यासारखा काम करणारा आमदार आत्तापर्यंत बारामतीला मिळालेला नाही, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे. संविधानाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे काय बोलावे ते प्रत्येकाने ठरवावे.