डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 07:00 IST2019-08-21T07:00:00+5:302019-08-21T07:00:02+5:30
पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते..

डेक्कन क्वीनचे रुपडे पालटणार : लवकरच एलएचबी डबे
पुणे : 'दख्खनची राणी' म्हणडे डेक्कन क्वीनचे रुपडे लवकरच पालटणार आहे. ही गाडी लिंके हाफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डब्यांची करण्यात येणार असून त्यामध्ये नव्या रूपातील डायनिंग कारही जोडली जाणार आहे. दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या या गाडीमुळे पुणे-मुंबई दरम्यानचा कालावधीही कमी होणार आहे.
भारतीय रेल्वेसह प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डेक्कन क्वीनने दि. १ जुन रोजी ९० वर्षात पदार्पण केले. पुणे ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या या गाडीमध्ये डायनिंग कार असल्याने प्रवाशांची या गाडीला विशेष पसंती असते. डायनिंग कार असलेली ही देशातील एकमेव गाडी असल्याने रेल्वेकडूनही गाडीची विशेष काळजी घेतली जाते. या गाडीच्या डब्यांना असलेल्या सध्याचा निळा व पांढरा रंगही वेगळा असल्याने गाडीची ओळख लगेचच पटते. आता हे डबे नव्या रुपात येणार आहेत. लवकरच एलएचबी प्रकारातील डबे असलेली गाडी प्रवाशांच्या सेवेत रुजु होणार आहे. विशेष म्हणजे पुर्वीच्या गाडीला असलेली डायनिंग कारची सुविधाही कायम ठेवली जाणार आहे. उलट नव्या रुपातील डायनिंग कार प्रवाशांसाठी आणखी आकर्षक असेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. नव्या रुपातील ही गाडी पुढील एक-दोन महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
एलएचबी गाडीला दोन्ही बाजुला इंजिन आहे. सध्या कर्जत ते लोणावळ्यादरम्यान घाटात गाडीला मागील बाजुला इंजिन जोडावे लागते.लोणावळ्यात आल्यानंतर पुन्हा हे इंजिन वेगळे केले जाते. यामध्ये खुप वेळ जातो. त्यामुळे सध्या या गाडीला सव्वा तीन तासांचा वेळ लागतो.एलएचबी ला दोन्ही बाजूला इंजिन असल्याने घाटातील वेळ वाचणार आहे. या गाडीला पुलपुश तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. त्यामुळे गाडीचा वेगही वाढणार आहे. सध्याचा गाडीचा रंगही कायम ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे. रेल्वे मंडळाकडून यावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सध्या पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सहा गाड्यांपैकी केवळ इंटरसिटी गाडीला एलएचबी कोच असून दोन महिन्यांपासून पुल-पुश तंत्रज्ञानाची चाचणीही घेतली जात आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्ष हर्षा शहा यांनी दिली.
------------------
डेक्कन क्वीनला एलएचबी कोच जोडले जाणार आहेत. तसेच डायनिंग कारही कायम राहणार आहे. मात्र, नव्या रूपातील गाडी कधी धावणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अजूनपर्यंत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
- वरिष्ठ रेल्वे अधिकारी