वाडे बोल्हाई येथील पांडवकालीन तळ्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 17:55 IST2017-11-01T17:48:38+5:302017-11-01T17:55:45+5:30
बोल्हाई मातेच्या दर्शनाला कुटुंबीयासमावेत आलेल्या तरुणाचा जवळच असलेल्या पांडवकालीन तळ्यातबुडून मृत्यू झाला. प्रकाश मोहनलाल गंगवाणी (वय ३२ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.

वाडे बोल्हाई येथील पांडवकालीन तळ्यामध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
पिंपरी संडास : वाडेबोल्हाई येथील श्रद्धास्थान असलेल्या बोल्हाई मातेच्या दर्शनाला कुटुंबीयासमावेत आलेल्या तरुणाचा जवळच असलेल्या पांडवकालीन तळ्यातबुडून मृत्यू झाला आहे. प्रकाश मोहनलाल गंगवाणी (वय ३२ वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजेच्या सुमारास भवानी पेठ, पुणे येथे राहणारे प्रकाश मोहनलाल गंगवाणी त्यांच्या वडिलांचे सोबत वाडेबोल्हाई येथे बोल्हाई मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिराजवळच तळे आहे. तळ्यामध्ये स्नान केल्यास आजार दूर होतात अशी श्रद्धा असल्यामुळे प्रकाश त्यांच्या वडिलाबरोबर या पांडवकालीन तळ्यावर गेला आणि कपडे काढून खडकावर बसला होता. त्यावेळी त्याचा तोल जावून पाण्यात पडला. प्रकाशाला पोहता येत नसल्यामुळे जवळच असलेल्या प्रकाशाच्या वडिलांनी आरडाओरडा करून मदत मागितली. आसपास असलेल्या तरुणांनी तत्काळ तळ्यात उड्या घेऊन शोध शोध केली परंतु प्रकाश गंगवानी सापडला नाही. दरम्यान घटना कळताच घटनास्थळी देवस्थानच्या पदाधिकार्यांनी धाव घेऊन शक्य ती मदत केली. अग्निशामक दलही तत्काळ घटनास्थळी हजर झाले आणि काही वेळातच प्रकाशला बाहेर काढण्यास यश मिळवले.
पोलिसांनी प्रेत ताब्यात घेऊन ससून येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
पुढील तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत पडळकर व हवालदार बेंद्रे करत आहेत.