अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने रेल्वेतच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 11:54 IST2025-07-20T11:54:18+5:302025-07-20T11:54:55+5:30
पुढे वैष्णोदेवी दर्शन घेऊन जम्मू ते जयपूर हा रेल्वे प्रवास भाविक करत होते. अलवर जंक्शन, राजस्थान येथे रेल्वे आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना अस्वस्थ वाटू लागले.

अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने रेल्वेतच मृत्यू
मंचर : पवित्र अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने रेल्वेतच मृत्यू झाल्याची घटना अलवर जंक्शन राजस्थान येथे घडली. बाळासाहेब नथू थोरात (४५, रा. मंचर) असे मरण पावलेल्या भाविकाचे नाव असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमरनाथ सेवा समितीच्या वतीने पवित्र अमरनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ८ जुलैला मंचर येथून भाविक रवाना झाले. त्यामध्ये मंचर शहरातील व्यापारी बाळासाहेब नथू थोरात हे सुद्धा होते. सर्व भाविकांनी पवित्र अमरनाथ येथे दर्शन घेतले. पुढे वैष्णोदेवी दर्शन घेऊन जम्मू ते जयपूर हा रेल्वे प्रवास भाविक करत होते. अलवर जंक्शन, राजस्थान येथे रेल्वे आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर बाथरूममध्ये ते चक्कर येऊन पडले. अमरनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश घुले यांनी तातडीने थोरात यांना सीपीआर दिला.
रेल्वे गार्ड तसेच टीसीच्या मदतीने बाळासाहेब थोरात यांना रेल्वेच्या बाहेर नेत सीपीआर देण्यात आला. मात्र, त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. अलवर येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रुग्णवाहिकेतून तेराशे किलोमीटरचा प्रवास करून मृतदेह मंचर येथे आणण्यात आला. तपनेश्वर स्मशानभूमीत बाळासाहेब थोरात यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात हे शिवसेना उबाठा पक्षाचे कार्यकर्ते होते. मंचर शहराचे माजी उपशहरप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. अमरनाथ यात्रेचे नियोजन ते करत होते. या यात्रेत त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.