पाचव्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू
By Admin | Updated: July 17, 2014 03:20 IST2014-07-17T03:20:51+5:302014-07-17T03:20:51+5:30
महापालिकेने राबविलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून निकिता चंद्रकांत निसर्गंध (वय १५, रा. कुलस्वामिनी सोसायटी, चिखली) या मुलीचा करुण अंत आला

पाचव्या मजल्यावरून पडून मुलीचा मृत्यू
पिंपरी : महापालिकेने राबविलेल्या घरकुल प्रकल्पातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून निकिता चंद्रकांत निसर्गंध (वय १५, रा. कुलस्वामिनी सोसायटी, चिखली) या मुलीचा करुण अंत आला. ही घटना बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास चिखली येथील कुलस्वामिनी हौसिंग सोसायटी येथे घडली. या प्रकाराने घरकुल परिसरात शोककळा पसरली आहे.
निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाईक-पाटील यांनी दिलेली माहिती अशी, सकाळी बाथरूमध्ये पाय घसरून पडल्याने निकिता जखमी झाली होती. त्यामुळे आईने तिला शाळेत जाऊ नको, असे सांगितले होते. सकाळी आई धुणी-भांड्याची कामे करण्यासाठी बाहेर गेल्याने निकिता घरात एकटीच होती. पाऊस येऊ लागल्याने गॅलरीत वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी ती गेली. त्या वेळी तोल जाऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ती खाली पडली. डोक्यास गंभीर मार लागला. त्यामुळे तिला वायसीएम रुग्णालयात त्वरित दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे
जाहीर केले.
निकिताच्या नातेवाइकांनी यामागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद केली असून, तपासात वेगळे काही निष्पण्ण झाल्यास तसा गुन्हा दाखल केला जाईल.’’
निसर्गंध कुटुंब दीड महिन्यापूर्वीच येथे राहावयास आले होते. निकिता स्पाईन रोड येथील महापालिकेच्या सी. के. चावला स्कूलमध्ये नववीत शिकत होती. आई धुणी-भांड्याचे काम करते. तिच्या मागे आई, २ बहिणी व २ भाऊ असा परिवार आहे. या घटनेने घरकुल प्रकल्प परिसरात शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी)