आळंदीकरांना फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे होतोय दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:05 IST2017-10-26T01:05:19+5:302017-10-26T01:05:38+5:30
शेलपिंपळगाव : आळंदीत अनेक फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे शहरातील विविध भागात मैलायुक्त पाणी मिळत आहे. परिणामी आळंदीकर नाराजी व्यक्त करत आहेत.

आळंदीकरांना फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे होतोय दूषित पाणीपुरवठा
शेलपिंपळगाव : आळंदीत अनेक फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमुळे शहरातील विविध भागात मैलायुक्त पाणी मिळत आहे. परिणामी आळंदीकर नाराजी व्यक्त करत आहेत. देहूफाटा आणि प्रदक्षिणा रस्त्यावर वारंवार प्रदूषित पिण्याच्या पाण्याचा सामना आळंदीकरांना करावा लागत आहे.
आळंदीमध्ये ब्रिटिशकालीन पिण्याच्या पाण्याची पाइपलाईन आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शहरात अनेक ठिकाणी फुटलेल्या आणि गंजलेल्या पाईपलाईन आहेत. तर काही ठिकाणी गटारलाईन आणि पाण्याची लाईन एकाच बाजूने गेल्याने फुटलेल्या पाईपलाईनमधे गटाराचे पाणी मिसळले जात आहे. परिणामी त्या भागातील नागरिकांनी प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. शहरातील देहूफाटा येथील काळेवाडीत गेली पंधरा दिवसांपासून प्रदूषित पाणी नळाद्वारे जात असून गटारलाईनसाठी खोदाई झाल्याने जेसीबीमुळे पाण्याची लाईन फुटली आहे. गटारलाईनचे काम निकृष्ट आणि त्यात पिण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना प्रदूषित पाणी नळाद्वारे मिळत आहे. हीच परिस्थिती प्रदक्षिणा रस्त्यावरही आहे.
>देहूफाटा येथे गटारलाईनचे काम करणाºया ठेकेदाराला काम बंद करण्यास सांगितले आहे. त्या ठिकाणी दुसरा ठेकेदार नेमुन काम सुरू केले जाईल. दोन दिवसांत देहूफाटा येथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळित होईल. याशिवाय शहरात सध्या विकासकामांमुळे जुन्या लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार होत आहे. यामुळे नागरिकांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. - समिर भूमकर, मुख्याधिकारी.