व्यापारी संकुल इमारत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:24 AM2018-06-12T03:24:46+5:302018-06-12T03:24:46+5:30

खडकी येथील मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल इमारतीची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. इमारत कोसळून किंवा काही भाग पडून मोठी दुर्घटना येथे घडू शकते.

 Dangerous building business complex | व्यापारी संकुल इमारत धोकादायक

व्यापारी संकुल इमारत धोकादायक

Next

खडकी -  येथील मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या व्यापारी संकुल इमारतीची मागील अनेक वर्षांपासून दुर्दशा झाली आहे. इमारत कोसळून किंवा काही भाग पडून मोठी दुर्घटना येथे घडू शकते. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून मागणी होत आहे.
खडकी बाजारात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे व्यापारी संकुल आहे. त्याचे बांधकाम जुने झाल्याने सदरची इमारत जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. इमारतीच्या चारही बाजूंनी स्लॅब आणि कठड्याचे प्लॅस्टर पडत आहे. इमारतीच्या छतावर आठ ते दहा फूट उंचीचे पिंपळाचे झाड आहे. त्यामुळे इमारतीला धोका पोहोचू शकतो. जिन्याचीही अवस्था वाईट आहे.
धोकादायक इमारती, वाडे, जुनी बांधकामे हटविण्याबाबत दर वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे संबंधित नागरिकांना नोटीस देण्यात येते; मात्र आता खुद्द बोर्डाच्या मालकीची इमारत जीर्ण झाली असून, मोडकळीस आली आहे. त्यामुळे त्यांना नोटीस कोण देणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने संकुलाच्या या इमारतीच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. बाजारात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे. या इमारतीचे प्लॅस्टर सातत्याने कोसळत आहे. त्यामुळे बांधकामातील सळया दिसू लागल्या आहेत. या इमारतीमधील सर्व दुकाने सुरू आहेत. दुकानदारांच्या जिवालाही धोका आहे. दुर्घटना होण्यापूर्वीच बोर्डाने येथे उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून आणि दुकानदारांकडून होत आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे इमारतीत सर्वत्र घाण आहे. येथे स्वच्छता मोहिम राबवून साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदारामार्फत इमारतीची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येईल. तोपर्यंत स्वच्छता व इमारतीवर वाढलेले मोठे पिंपळाचे झाड त्वरित काढण्यात येईल.
- कमलेश चासकर, नगरसेवक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड
 

Web Title:  Dangerous building business complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.